सातारा प्रतिनिधी
सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि डॉल्बीच्या आवाजाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना, साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर गणेश मंडळांना परखड शब्दांत सल्ला दिला. डीजे किंवा डॉल्बीला विरोध नसून, ध्वनीची तीव्रता आणि कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘डीजे मुक्ती’ किंवा ‘डॉल्बी मुक्ती’ अशा संकल्पनांबाबत बोलताना पिंगळे यांनी डीजे आणि डॉल्बी यातील फरक स्पष्ट केला. डीजे म्हणजे डिस्को जॉकी असून तो गाणी निवडून वाजविण्याचे काम करतो. त्यामुळे डीजेवर बंदी घालण्याचा प्रश्नच येत नाही. डॉल्बी हे ध्वनीशी संबंधित तंत्रज्ञान असून, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही तंत्रज्ञानावर बंदी घातलेली नाही. मात्र, ध्वनीची निर्धारित मर्यादा पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे डीजे किंवा डॉल्बीपेक्षा त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजाची तीव्रता हा मुख्य मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.
मोठ्या आवाजाच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधताना पिंगळे यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना उपरोधिक पद्धतीने एक प्रयोग करण्याचा सल्ला दिला. मंडळांना मोठ्या आवाजात डॉल्बी वाजविण्याची परवानगी हवी असेल, तर मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्या घरातील आजी-आजोबा किंवा वृद्ध व्यक्तींना स्पीकरसमोर तासभर बसवावे. अध्यक्ष स्वतः अतिवरिष्ठ असतील तर त्यांनी स्वतः स्पीकरसमोर बसावे आणि त्यानंतर मोठ्या आवाजाला परवानगी द्यावी का, याचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
ध्वनीप्रदूषणाची मर्यादा ही कोणत्याही एका घटकासाठी नसून समाजातील सर्व नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून निश्चित करण्यात आली आहे. मोठ्या आवाजाचा परिणाम केवळ वयोवृद्धांवरच होत नाही, तर तरुणांच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही त्याचा कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. गणेशोत्सवाचा उत्साह आणि परंपरा कायम ठेवताना नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड न करता ध्वनीची निर्धारित मर्यादा पाळणे आवश्यक आहे, असे पिंगळे यांनी स्पष्ट केले.

