स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडे मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट या बनावट उपकरणाची बेकायदेशीर जोडणी करून कृत्रिम भाडेवाढ करणाऱ्या पाच जणांवर दहिसर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत मीटरमध्ये छेडछाड केलेल्या पाच टॅक्सी-रिक्षा तसेच भाडे मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त करण्यात आले.
दहिसर परिसरातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून मीटरमध्ये यंत्राचा वापर करून प्रवाशांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी डमी प्रवाशाच्या माध्यमातून १ सप्टेंबर रोजी टॅक्सी क्रमांक एमएच ०१ सीजे ६४८७ मध्ये प्रवास करून पाहणी केली. यावेळी चालकाने भाडे मीटर झाकून ठेवले होते. त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी टॅक्सी ताब्यात घेतली.
त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभाग, बोरीवली यांच्यामार्फत टॅक्सीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी भाडे मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट उपकरणाची बेकायदेशीर जोडणी करून छेडछाड केल्याचे उघड झाले. या उपकरणाच्या माध्यमातून कृत्रिमरीत्या भाडे वाढवून प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी अधिक तपास केला असता अमीन रमजान पठाण याने संबंधित टॅक्सीच्या मीटरमध्ये हे उपकरण बसवून दिल्याचे समोर आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आणखी चार टॅक्सी व रिक्षांच्या मीटरमध्ये अशाच प्रकारे फेरफार केल्याचे उघड झाले. या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२९३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३९८ (४), तसेच एमएमआर कायद्यातील कलम ३३, ३५ आणि १४५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत एमएच ०१ सीजे ६४८७ क्रमांकाची मारुती सुझुकी काळी-पिवळी टॅक्सी, एमएच ०२ डीयू ०७७७ व एमएच ०३ बीवाय ४२६८ क्रमांकाच्या बजाज रिक्षा, एमएच ०२ बीक्यू ७३९२ क्रमांकाची मारुती सुझुकी टॅक्सी आणि एमएच ०१ ईएम ६०४८ क्रमांकाची मारुती आर्टिका कूल कॅब जप्त करण्यात आली.
या प्रकरणी जोएब अलताफ देशमुख (३२), अमीन रमजान पठाण (३१), रियाझ अब्दुलगानी शेख (४५), नाजीर इब्राहिम पटेल (५७) आणि आनंद कुमार नानाप्रसाद राय (६०) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
अप्पर पोलिस आयुक्त शशिकुमार मीना, पोलिस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहाय्यक पोलिस आयुक्त जयराज रणवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि गुन्हे विभागाचे मारुती सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश शिवाजी साळुंके, पोलिस हवालदार हेमंत बाबुराव विचारे, पोलिस शिपाई सुनील चंद्रकांत राठोड, संतोष काशिनाथ भागवत आणि ऋषिकेश प्रविण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

