शमशाबाद :
सोशल मीडियावर दिसणाऱ्या रील्सचा गैरवापर करून रातोरात श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा तेलंगणातील शमशाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इन्स्टाग्रामवरील रील्स पाहून घरातच बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीतील तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांचा एक साथीदार फरार आहे. आरोपींकडून तब्बल २ लाख ९१ हजार १०० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
शमशाबाद झोन टास्क फोर्स पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कलर प्रिंटर, लॅमिनेटर मशीन, शाईचे कार्ट्रिज आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.
इन्स्टा रील्स पाहून बनावट नोटांचा फंडा
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नालगोंडा जिल्ह्यातील रहिवासी असलेले रामावत रामू, रामावत मोतीलाल आणि रामावत गांधी यांच्यासह सुधीर नावाचा त्यांचा साथीदार रातोरात मोठी कमाई करण्याच्या प्रयत्नात होते. कमी कष्टात मोठे पैसे मिळवण्याच्या हव्यासातून त्यांनी सोशल मीडियावर बनावट नोटा तयार करण्यासंदर्भातील रील्स आणि व्हिडीओ शोधण्यास सुरुवात केली.
या कंटेंटच्या आधारे त्यांनी बनावट नोटा तयार करण्याची पद्धत शिकून घेतली. त्यानंतर कलर प्रिंटर आणि साध्या कागदांचा वापर करून भारतीय चलनाच्या ५००, २०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली.
घरीच नोटा छापून त्यांना लॅमिनेशनसह अधिक हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
दिवसा नोटा छापायच्या, रात्री बाजारात खपवायच्या
बनावट नोटा तयार केल्यानंतर त्या बाजारात चलनात आणण्यासाठी आरोपींनी रात्रीची वेळ निवडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रात्रीच्या वेळी दारूची दुकाने, ढाबे आणि पानटपऱ्यांवर बनावट नोटा चालवायचे.
कमी प्रकाश, ग्राहकांची गर्दी आणि व्यवहारातील घाई याचा फायदा घेत खऱ्या नोटांमध्ये बनावट नोटा मिसळून देण्याची त्यांची पद्धत होती. त्यामुळे सुरुवातीला या नोटा सहजपणे लक्षात येत नसल्याचा आरोपींचा समज होता.
पोलिसांना माहिती मिळताच कारवाई
शमशाबाद परिसरात बनावट नोटांचा वापर वाढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर टास्क फोर्सने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे संशयितांवर पाळत ठेवली आणि त्यानंतर छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा आणि त्या तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले. एकूण २,९१,१०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय कलर प्रिंटर, लॅमिनेटर मशीन, शाईचे कार्ट्रिज आणि इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणातील चौथा आरोपी सुधीर सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सोशल मीडियावरील कंटेंटवरही पोलिसांची नजर
या कारवाईनंतर टास्क फोर्सचे अतिरिक्त डीसीपी के. एस. राव यांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सहज पैसे कमावण्याचे किंवा गुन्हे करण्याचे मार्ग दाखवणारा कंटेंट पाहून त्याची अंमलबजावणी करणे गंभीर परिणामांना आमंत्रण देऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
बनावट नोटा तयार करणे, त्या बाजारात चालवणे किंवा अशा गुन्ह्यांना प्रोत्साहन देणारा कंटेंट तयार करणे आणि प्रसारित करणे याबाबत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
रील्सच्या नादात थेट तुरुंगाची वाट
इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक व्हिडीओ किंवा रील खरी आणि कायदेशीर माहिती देणारी असेलच असे नाही. मात्र, सहज पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी त्याचे अनुकरण केल्यास त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात, हे शमशाबादमधील या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आले आहे.
रातोरात श्रीमंत होण्याच्या हव्यासात आरोपींनी घरातच नोटा छापण्यास सुरुवात केली; मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर त्यांच्या हातात पैसा नव्हे, तर तुरुंगाची बेडी आली.

