मुंबई/पुणे प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धकांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यात डीजे बंदीच्या मागणीसाठी नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले असताना, मुंबईत मात्र गणेशोत्सवादरम्यान चार दिवस रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि उपनगरांमध्ये या चार दिवसांमध्ये रात्री उशिरापर्यंत ढोल-ताशांसह डीजेचा आवाज ऐकू येण्याची शक्यता आहे.
मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनीवर्धक वापरासाठी निश्चित केलेल्या दिवसांपैकी गणेशोत्सवासाठी चार दिवस निश्चित केले आहेत. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, पाचव्या दिवशी, गौरी विसर्जनाच्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीला रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
चार दिवसांची विशेष सवलत
ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० नुसार, सर्वसाधारणपणे रात्रीच्या वेळेत ध्वनिवर्धकांच्या वापरावर निर्बंध आहेत. मात्र धार्मिक आणि सांस्कृतिक सणांच्या पार्श्वभूमीवर शासनाला वर्षातील काही निश्चित दिवसांसाठी या वेळेच्या मर्यादेत शिथिलता देण्याची तरतूद आहे.
मुंबई शहरासाठी अशा १५ दिवसांची यादी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये नवरात्रोत्सव, दिवाळी, ख्रिसमस, ईद यांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक सणांचा समावेश आहे. यापैकी गणेशोत्सवासाठी चार दिवस निश्चित करण्यात आले आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवातील १५ सप्टेंबरचा दीड दिवसांचा गणपती विसर्जन दिवस, १८ सप्टेंबरचा पाच दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाचा दिवस, १९ सप्टेंबरचा गौरी विसर्जनाचा दिवस आणि २५ सप्टेंबरची अनंत चतुर्दशी या चार दिवसांचा त्यात समावेश आहे.
मंडळांना आणखी एका दिवसाची संधी
विशेष म्हणजे, ज्या दिवशी विसर्जनाचा दिवस नाही, त्या दिवशी स्थानिक धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्याचा अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित नियमांनुसार स्थानिक परिस्थितीचा विचार करून अतिरिक्त दिवसासाठीही परवानगी दिली जाऊ शकते.
मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारक्षेत्रातील १५ पैकी १३ दिवसांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात उपनगरात चार दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिवर्धक वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुण्यात मात्र डीजे बंदीची मागणी
एकीकडे मुंबईत नियमांनुसार ध्वनिवर्धकांना विशेष सवलत देण्यात आली असताना पुण्यात मात्र डीजेच्या वाढत्या आवाजाविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आवाजात डीजे वाजवल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच लहान मुलांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी गणेशोत्सवात डीजेवर कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणी पुणेकरांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील सवलत आणि पुण्यातील डीजे बंदीची मागणी यामुळे ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

