धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ (वय ३०) यांनी आपल्या तीन लहान मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरील उंच बुरुजावरून उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेत अश्विनी पौळ, त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य आणि जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने धाराशिव जिल्ह्यासह कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
अश्विनी पौळ या महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून मुलांसह माहेरी राहण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, कौटुंबिक छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्याचा दावा माहेरच्या नातेवाईकांनी केला असून, या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
अश्विनी पौळ या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित कुस्तीपटू म्हणून परिचित होत्या. कुस्तीची आवड आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी पाच सुवर्ण आणि सहा रौप्य पदके पटकावून महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले होते. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य कुस्ती क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांना लहानपणापासूनच कुस्तीचे संस्कार मिळाले होते. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ अशी ओळख मिळाली होती.
घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. माहेरच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणी कुस्तीपटूचा आणि तीन निरागस बालकांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

