स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोड्यासारख्या तीन गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल २९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला भांडुप पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथून शिताफीने अटक केली. रविंद्र उर्फ पापलेट एकनाथ विचारे (वय ६१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीनही गुन्ह्यांमध्ये फरार घोषित करून स्थायी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.
भांडुप पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गंभीर गुन्ह्यांमध्ये विचारे हा सन १९९७ पासून फरार होता. या कालावधीत त्याने नाव आणि पत्ता बदलून वास्तव्य केल्याने पोलिसांना त्याचा ठावठिकाणा मिळत नव्हता. भांडुप पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून त्याचा शोध सुरू होता.
दरम्यान, आरोपीच्या दूरच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास केला. या तपासातून रविंद्र विचारे हा सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक नागठाणे येथे दाखल झाले. तेथे सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला भांडुप पोलीस ठाण्यातील १९९० सालच्या खून प्रकरणात मुंबईतील सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
अटक करण्यात आलेला आरोपी रविंद्र उर्फ पापलेट एकनाथ विचारे हा नागठाणे, तालुका व जिल्हा सातारा येथील रहिवासी आहे. भांडुप पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याचे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
२९ वर्षांपासून आरोपीचा ठावठिकाणा उपलब्ध नसतानाही गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेऊन अटक करण्याची कामगिरी भांडुप पोलिसांनी केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोज शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त, पूर्व परिमंडळ-३ अभयसिंह देशमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, भांडुप विभाग अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपना श्रीरसागर आणि पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक दळवी, पोलीस हवालदार राजेंद्र यादव, पोलीस शिपाई विनायक झाडे, पोलीस शिपाई सुमीत पोळ आणि महिला पोलीस शिपाई रुपाली हाडवळे यांनी ही कारवाई पार पाडली.

