सातारा प्रतिनिधी
वाई : भुईंज पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये एकूण ५ किलो ७३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ₹१ लाख २१ हजार ३३० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. हणमंत किसन कणसे (रा. आसले, ता. वाई, जि. सातारा), अमरदीप संजय गायकवाड (वय ३८, रा. सोमवार पेठ, फलटण) आणि संजय रायबा गायकवाड (वय ६०, रा. सोमवार पेठ, फलटण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सातारा जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भुईंज पोलिसांनी ही धडक कारवाई केली. दोन स्वतंत्र छाप्यांदरम्यान गांजाचा साठा जप्त करण्यात आला असून, तिन्ही आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे, स्थानिक गुन्हे शाखा, साताराचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सुरज शिंदे, पुजारी, अजित मोरे, मुलानी, लैलेश फडतरे, रोहित निकम आणि अरुण पाटील यांचा सहभाग होता.
तसेच भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी तोडरमल, पोलीस उपनिरीक्षक वैभव टकले, सहाय्यक पोलीस फौजदार नितीन जाधव, गणेश घोटकर, पोलीस हवालदार सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते आणि आकाश कुंभार यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

