सातारा प्रतिनिधी
सातारा : इतिहास, परंपरा आणि बंधुभावाची वीण अधिक घट्ट करत राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानच्या वतीने राजधानी सातारा येथे साळुंखे बंधू-भगिनींचे भव्य स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. १६ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्नेहसंमेलनाला साळुंखे परिवारातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या ऐतिहासिक वारशाची जपणूक करत पुढील पिढीपर्यंत तो पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. शिवाजी आप्पा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष प्रतिक साळुंखे, नागठाणे जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि साळुंखे परिवारातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चालुक्य राजवंशाचा इतिहास पुस्तिकेत
स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरले ते ‘राजे साळुंखे चालुक्य राजवंशाची गाथा’ या माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेले अनावरण. साळुंखे परिवाराच्या इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या या पुस्तिकेत चालुक्य राजवंशाच्या उदयापासून साळुंखे आडनावाच्या निर्मितीपर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे. याशिवाय विविध पदनावे, कुलाचार तसेच साळुंखे परिवाराशी संबंधित प्रमुख ११ पदनावांतील आडनावांचा इतिहासही सविस्तरपणे मांडण्यात आला आहे.
आपल्या समाजाच्या इतिहासाची माहिती केवळ दस्तऐवजांपुरती मर्यादित न राहता ती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने पुस्तिकेची निर्मिती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. इतिहास आणि परंपरेची ओळख करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
वीर कमळोजी साळुंखे यांच्या शौर्यगाथेचा पोवाडा
प्रतापगडचे वीर कमळोजी साळुंखे यांच्या शौर्यगाथेवर आधारित पोवाड्याचेही यावेळी अनावरण करण्यात आले. ऐतिहासिक वारसा आणि शौर्यपरंपरा जिवंत ठेवणाऱ्या या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला. पूर्वजांच्या पराक्रमाची आणि त्यागाची माहिती नव्या पिढीला व्हावी, तसेच आपल्या इतिहासाविषयी अभिमानाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने साळुंखे परिवारातील विविध घटक एकत्र आल्याने परस्परांतील स्नेह, संवाद आणि बंधुभावाला अधिक बळ मिळाले. इतिहास आणि परंपरेची जपणूक करत सामाजिक एकजूट मजबूत करण्याचा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला.
पदाधिकाऱ्यांचे परिश्रम
स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शहराध्यक्ष प्रवीण साळुंखे, युवा जिल्हाध्यक्ष अभिजीत साळुंखे, महिला अध्यक्षा पल्लवी साळुंखे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सातारा जिल्हाध्यक्ष रामराव साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
इतिहासाची जपणूक, परंपरेचा अभिमान आणि बंधुभावाची सांगड घालत साळुंखे परिवाराला एका व्यासपीठावर आणणारा हा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

