सातारा प्रतिनिधी
सातारा : जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी काल राजवाडा ते शिवतीर्थ या मार्गावर भव्य वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या वॉकेथॉनमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याबरोबरच तो जमिनीत जिरवणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी केले.
डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला सुरुवात झाली. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. शिंदे म्हणाल्या, महाराष्ट्र जलसमृद्ध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाच्या चळवळीत योगदान देणे गरजेचे आहे. शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये जलसाक्षरता निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. बालवयातच पाण्याचे महत्त्व समजल्यास संवेदनशील आणि जबाबदार पिढी घडेल. जलसंधारण सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञांना शाळांमध्ये आमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘एक शाळा, एक खड्डा’ या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शोषखड्डा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी वॉकेथॉनला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. पाणी हे मानवी जीवनाचा मुख्य आधार असून त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. माती अडवून पाणी जिरवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वॉकेथॉन हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न राहता जलसंवर्धनाची प्रेरणा प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी सहा वाजता सुरू झालेल्या या वॉकेथॉनमध्ये विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. पाणी बचत आणि जलसंवर्धनाच्या घोषणा देत नागरिकांनी शहरातून मार्गक्रमण केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली.

