नागपूर प्रतिनिधी
राहुल गांधी यांच्या पुण्यातील आगामी विद्यार्थी संवाद कार्यक्रमावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या महाविद्यालयांतील मुलींचेच रजिस्ट्रेशन करण्यात येणार असून, त्यांनाच कार्यक्रमस्थळी आणण्याचे आदेश असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. त्यामुळे हा खरोखरच विद्यार्थ्यांशी खुला संवाद आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याबाबत गुरुवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘‘ही ‘छात्रों की गूंज’ आहे की राहुल गांधी राजकारणात आपले स्थान शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे मला माहिती नाही. मात्र, त्यांनी हा कार्यक्रम खुला ठेवला असता आणि सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले असते, तर तो खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांशी संवाद ठरला असता.’’
‘सरसकट तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद झाला असता’
राहुल गांधी यांनी विविध विचारांच्या आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी अपेक्षा व्यक्त करत फडणवीस यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘‘राहुल गांधी यांनी सरसकट तरुणांशी संवाद साधला असता, तर मला आनंद झाला असता. मात्र, माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या नेत्यांद्वारे संचालित महाविद्यालयांतील मुलींचेच रजिस्ट्रेशन करायचे आणि त्यांना कार्यक्रमस्थळी आणायचे, असे आदेश देण्यात आले आहेत,’’ असा दावा त्यांनी केला.
‘‘पण ठीक आहे. त्यादेखील आपल्याच मुली आहेत. त्यांच्याशी संवाद साधला तरी आनंद आहे,’’ असे म्हणत फडणवीस यांनी या कार्यक्रमावरून काँग्रेसला टोला लगावला.
फडणवीस यांच्या या दाव्यामुळे राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या आयोजनावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांशी संवादाच्या कार्यक्रमाला राजकीय पक्षाशी संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित ठेवले जात आहे का, हा मुद्दा आता चर्चेत आला आहे.
‘वंदे मातरम्’ ठरावावरून काँग्रेसवर टीका
दरम्यान, ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतासंदर्भात काँग्रेसने केलेल्या ठरावावरूनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ गीताबाबत मंजूर केलेला ठराव संविधानविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘‘आता भारतात ब्रिटिशांचे राज्य नाही. स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला निर्णय हा संवैधानिक असतो. स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला निर्णय आम्ही मान्य करणार नाही, गुलामीची परंपरा आम्ही कायम ठेवू, हे काँग्रेसचे धोरण या निमित्ताने दिसून आले आहे,’’ अशी टीका फडणवीस यांनी केली.
त्यामुळे ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरूनही सत्ताधारी आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
लाडकी बहीण योजनेवर फडणवीसांचे महत्त्वाचे स्पष्टीकरण
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांबाबतही महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन-चार महिन्यांत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची तपासणी करणे शक्य नव्हते. त्यानंतर सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आणि ई-केवायसी हा त्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘ज्या लोकांच्या लक्षात आले की, आपण नियमांच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना वारंवार संधी देण्यात आली. मात्र, त्यांनी ई-केवायसी केले नाही. एक कोटी ६५ लाख बहिणींनी ई-केवायसी केले असून, त्या पात्र ठरल्या आहेत आणि त्यांना योजनेचे पैसे मिळत आहेत,’’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
काही लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, अनेक महिलांच्या लक्षात आले की, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आयकर भरतात. आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नसल्याने अशा लाभार्थ्यांचीही छाननी करण्यात आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘पात्र बहिणींना सरकार असेपर्यंत पैसे मिळत राहतील’
‘लाडकी बहीण’ योजना ही आर्थिक मदतीची आणि आधाराची गरज असलेल्या महिलांसाठी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याची कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘‘पुरुष लाभार्थ्यांवर आपण कारवाई करीत आहोत आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करीत आहोत. काही सरकारी कर्मचारीही या योजनेत लाभार्थी झाले होते. सगळेच अर्ज करीत आहेत म्हणून त्यांनीही अर्ज केला. मात्र, अशा प्रकरणांमध्ये त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल,’’ असे फडणवीस यांनी सांगितले.
लाभार्थ्यांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा करताना त्यांनी आता योजनेतील लाभार्थ्यांचा आकडा ‘१०० टक्के व्हेरिफाईड’ असल्याचे सांगितले. तसेच, पात्र महिलांना राज्यात भाजप-महायुतीचे सरकार असेपर्यंत योजनेचा लाभ मिळत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींच्या पुण्यातील विद्यार्थी संवाद कार्यक्रमावरून केलेला दावा, ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरून काँग्रेसवर केलेली टीका आणि ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांबाबत दिलेले स्पष्टीकरण यामुळे फडणवीस यांच्या नागपुरातील पत्रकार परिषदेला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

