नागपूर प्रतिनिधी
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी देश-विदेशातून लाखो अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन करतात. अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता यंदा दीक्षाभूमी परिसरात पाणी, निवारा, स्वच्छतागृहे, स्वच्छता, अन्न आणि आरोग्य यांसह सर्व मूलभूत सुविधा जागतिक दर्जाच्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे सिद्धांत पाटील यांनी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दीक्षाभूमी स्मारक समिती, नागपूर महानगरपालिका तसेच संबंधित शासकीय विभागांकडे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, मागण्यांची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने पूर्वतयारी करून अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरवर्षी मोठ्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होत असल्याने त्यांच्या निवासाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, स्वच्छता, आरोग्यसेवा आणि भोजनाची सुविधा हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो. अनुयायांची संख्या लक्षात घेऊन तात्पुरत्या सुविधांऐवजी कायमस्वरूपी आणि दर्जेदार सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे वंचित बहुजन आघाडीने निवेदनात नमूद केले आहे.
समाजकल्याण भवनाचा उपयोग करण्याची मागणी
दीक्षाभूमी परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या प्रशस्त भवनाचा यासाठी प्रभावीपणे उपयोग करावा, अशी मागणी सिद्धांत पाटील यांनी केली. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दरवर्षी अनुयायांच्या निवासासह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे या भवनासह विभागाकडील उपलब्ध साधनसामग्री आणि सुविधांचा योग्य नियोजन करून वापर केल्यास अनुयायांच्या निवास, अन्न-पाणी आणि आरोग्याच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात उपाययोजना करता येऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे.
अर्धवट कामे तातडीने पूर्ण करा
धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी ऐनवेळी न करता आतापासूनच सुरू करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरातील अर्धवट बांधकामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच परिसरातील जमीन समतल करून पावसामुळे चिखल निर्माण होणार नाही आणि अनुयायांना ये-जा करताना अडचणी निर्माण होणार नाहीत, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
लाखो अनुयायांच्या उपस्थितीचा विचार करून वाहतूक, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन, आरोग्य पथके, निवारा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा यांचे व्यापक नियोजन प्रशासनाने करावे. दीक्षाभूमी हे देश-विदेशातील बौद्ध अनुयायांसाठी श्रद्धेचे आणि ऐतिहासिक महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे येणाऱ्या अनुयायांना दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली.”यावेळी धम्मदीप लोखंडे, धीरज सोनटक्के, साहिल डोंगरे आदी उपस्थित होते.

