नागपूर प्रतिनिधी
नागपूर शहरातील OYOसह हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस आणि होम-स्टेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी आता कडक पावले उचलली आहेत. मानवी तस्करी, बेकायदेशीर देहविक्री, फसवणूक आणि अन्य गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी ‘ऑपरेशन शक्ती’च्या माध्यमातून हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नव्या नियमावलीनुसार ग्राहकांना प्रवेश देण्यापूर्वी ओळखपत्र आणि वयाची पडताळणी करणे बंधनकारक असून, हॉटेल परिसरातील सीसीटीव्हीचे किमान ९० दिवसांचे फुटेज जतन करावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल मालक आणि व्यवस्थापकांविरुद्ध थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात नियमावली जारी केली आहे. सप्टेंबर २०२६ ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही नियमावली लागू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस तसेच होम-स्टेच्या व्यवस्थापनाने निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहणार आहे.
नियमावलीनुसार प्रत्येक OYO आणि इतर हॉटेलच्या मुख्य भागात ‘मानवी तस्करी आणि बेकायदेशीर कामांना थारा दिला जाणार नाही’, असा ‘झिरो टॉलरन्स’चा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये ग्राहकाला खोली देण्यापूर्वी त्याचे मूळ ओळखपत्र तपासावे लागणार असून, संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती रजिस्टर किंवा डिजिटल प्रणालीमध्ये नोंदवावी लागणार आहे. ओळखपत्रावर जन्मतारीख आणि कायमस्वरूपी पत्ता असणे आवश्यक आहे. केवळ पॅन कार्ड सामान्य ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाणार नसल्याचेही नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
हॉटेलमध्ये वास्तव्यास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे वय आणि ओळख यांची योग्य पडताळणी करणे ही हॉटेल व्यवस्थापनाची जबाबदारी राहणार आहे. दोन्ही व्यक्ती १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या असल्यास त्यांच्या संमतीने हॉटेलमध्ये राहणे कायदेशीर असले, तरी त्यांची ओळख व वय तपासण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. विशेषतः अल्पवयीन व्यक्तींच्या प्रवेशाबाबत हॉटेल व्यवस्थापनाला अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पालक किंवा अधिकृत पालक सोबत नसल्यास अल्पवयीनांना प्रवेश देता येणार नाही.
हॉटेलच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेशद्वारापासून लॉबीपर्यंत २४ तास सीसीटीव्ही कार्यरत ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांचे किमान ९० दिवसांचे फुटेज सुरक्षित ठेवावे लागणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद अथवा नादुरुस्त आढळल्यास ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने सुरक्षाव्यवस्थेबाबत कोणतीही हलगर्जी केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
दरम्यान, नागपूर पोलिसांनी OYO कंपनीच्या सहकार्याने अनधिकृतपणे OYOचे नाव आणि लोगो वापरणाऱ्या हॉटेल्सविरोधातही कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत २० पेक्षा अधिक हॉटेल्सवरील अनधिकृत OYOचे साईनबोर्ड हटविण्यात आले असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे OYOच्या नावाचा गैरवापर करून व्यवसाय करणाऱ्या हॉटेल्सनाही आता पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
नागपूर शहरात अनेक हॉटेल्सच्या बाहेर OYOचे फलक मोठ्या प्रमाणात लागलेले दिसतात. या हॉटेल्सच्या आजूबाजूच्या नागरिकांकडूनही विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली असून, हा विषय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनासही आणून दिला होता. त्यानंतर पोलिसांनी तयार केलेली नियमावली आता कठोरपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘नागपूर शहरात प्रत्येक दोन हॉटेलच्या बाजूला OYOचा बोर्ड लागलेला दिसतो. हॉटेलच्या आजूबाजूच्या नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. याबाबत पोलीस आयुक्तांसोबत चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनाही हा विषय सांगितला होता. मुख्यमंत्र्यांनीही हा विषय गांभीर्याने घेतला आहे. आयुक्तांनी चांगली नियमावली तयार केली आहे. आता OYO हॉटेलमध्ये प्रवेश घेताना सर्व रेकॉर्ड ठेवावे लागणार असून, पोलिसांची OYOवर कडक नजर असणार आहे. नागपूर जिल्ह्याची सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा बिघडणार नाही, याची काळजी घेतली जात आहे,’ असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
नव्या नियमावलीमुळे हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायातील बेकायदेशीर प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, या नियमांची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती प्रभावीपणे होते आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून किती कठोर कारवाई केली जाते, याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

