मुंबई प्रतिनिधी
मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात एकाच घरात नौदलातील कर्मचाऱ्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (१५ ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मृतांमध्ये दोन महिन्यांचे चिमुकले बाळ आणि तीन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
नौदल कर्मचाऱ्याच्या घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर घराची पाहणी केल्यानंतर चौघेही मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक माहितीनुसार, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी आणि दोन मुलांना विष दिल्यानंतर स्वतः आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव, आर्थिक अडचण किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा पोलीस तपास करत आहेत.
चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेचा तपास मुंबई पोलीस आणि भारतीय नौदलाकडून संयुक्तपणे सुरू आहे.
दरम्यान, भारतीय नौदलाने निवेदन जारी करत नेव्ही नगर, कुलाबा येथे १५ ऑगस्ट रोजी नौदलातील एका नौसैनिकासह त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेच्या तपासात भारतीय नौदलाकडून पोलिसांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचेही नौदलाने सांगितले.

