जालना प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतलेले मनोज जरांगे पाटील उपचार सुरू असतानाच रुग्णालयातून तडकाफडकी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत. त्यांनी रविवारी मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांची बैठक बोलावली असून, या बैठकीत सरकारने काढलेल्या विविध शासन निर्णयांचा (जीआर), योजनांचा आणि मराठा आरक्षणाशी संबंधित घडामोडींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे बैठकीनंतर जरांगे पाटील कोणती भूमिका जाहीर करतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार अर्धवट सोडून ते अंतरवाली सराटीत पोहोचले आहेत. बैठक संपल्यानंतर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती आहे.
पुढील दौऱ्याची घोषणा होण्याची शक्यता
जरांगे पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला असून, या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजातील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. आता या बैठकीनंतर ते पुढील दौऱ्याची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाडा किंवा विदर्भ दौऱ्याबाबत ते भूमिका स्पष्ट करू शकतात.
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या भूमिकेचा आढावा घेत असतानाच कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
२९ ऑगस्टपासून आंदोलनाची हाक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यभरातील मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर सरकारच्या पातळीवरही हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत जरांगे पाटील कोणते मुद्दे मांडतात, सरकारच्या जीआर आणि योजनांबाबत काय भूमिका घेतात आणि पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, याबाबत ते काय सांगतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

