मुंबई प्रतिनिधी
सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध विभागांची कार्यालये आणि स्वतंत्र पोर्टल्सच्या फेऱ्या मारण्याची नागरिकांची कसरत आता कमी होणार आहे. राज्य सरकारने MahaDBT पोर्टलचा व्यापक विस्तार सुरू केला असून, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आणखी २९ योजनांचे ऑनबोर्डिंग करण्यात आले. त्यामुळे MahaDBT वर कार्यान्वित योजनांची संख्या ७६ वरून १०५ झाली आहे. विशेष म्हणजे आणखी २३१ योजनांचे ऑनबोर्डिंग प्रक्रियेत असून, त्या टप्प्याटप्प्याने या एकाच डिजिटल व्यासपीठावर आणण्याची तयारी सुरू आहे.
राज्याच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी एकच डिजिटल प्रवेशद्वार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाण्याची किंवा स्वतंत्र पोर्टलवर अर्ज करण्याची गरज कमी होऊन, घरबसल्या अथवा जवळच्या सेवा केंद्रातून योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे २९ नवीन योजनांच्या ऑनबोर्डिंगचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल प्रणालीमुळे योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी होत असल्याचे सांगितले. पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचविण्यासोबतच योजनांचा गैरवापर रोखण्यासाठीही डिजिटल यंत्रणा उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘सेकंड जनरेशन रिफॉर्म्स’ला वेग
शासनाच्या ‘सेकंड जनरेशन रिफॉर्म्स’अंतर्गत MahaDBT व्यवस्था अधिक सक्षम, कार्यक्षम आणि विश्वासार्ह करण्याचे काम सुरू आहे. भविष्यात शासनाच्या प्रमुख योजना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नागरिककेंद्री डिजिटल सुधारणांना आणखी वेग देताना अर्जापासून मंजुरीपर्यंतची प्रक्रिया शक्य तितकी सुलभ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विविध विभागांच्या योजनांचे टप्प्याटप्प्याने ऑनबोर्डिंग करण्यात येत असून, नवीन योजना पोर्टलवर आणण्यासाठी लागणारा कालावधीही कमी करण्यावर भर दिला जात आहे.
एकाच ठिकाणी अर्ज, रिअल-टाइम माहिती
MahaDBT २.० मध्ये विविध योजनांसाठी एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. सिंगल साइन-ऑन, लाईव्ह डॅशबोर्ड आणि ‘नो युवर बेनिफिट’ यांसारख्या सुविधांमुळे नागरिकांना अर्जाची स्थिती तसेच मिळणाऱ्या लाभाची माहिती सहजपणे पाहता येणार आहे.
आधार आधारित पडताळणी, एंड-टू-एंड डिजिटल प्रक्रिया आणि थेट लाभ हस्तांतरणामुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. ऑफलाइन प्रक्रियेतून ऑनलाइन व्यवस्थेकडे संक्रमण करताना मंजुरीची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न आहे.
ओबीसी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या योजनांचा समावेश
१५ ऑगस्ट रोजी MahaDBT वर समाविष्ट करण्यात आलेल्या २९ योजनांमध्ये इतर मागासवर्गीय विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या योजनांचा समावेश आहे. या योजनांचे यशस्वी ऑनबोर्डिंग केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांचे अभिनंदन केले.
माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शासकीय सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांना डिजिटल माध्यमातून सेवा मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यावर विभागाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, माहिती तंत्रज्ञान आयुक्त भुवनेश्वरी पी. यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
२३१ योजनांकडे लक्ष”
MahaDBT वर यापूर्वी ७६ योजना कार्यान्वित होत्या. १५ ऑगस्टला आणखी २९ योजनांची भर पडल्याने ही संख्या आता १०५ झाली आहे. त्याचवेळी २३१ योजनांचे ऑनबोर्डिंग सुरू असल्याने आगामी काळात MahaDBT हे शासनाच्या विविध योजनांसाठीचे प्रमुख डिजिटल व्यासपीठ बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी योजनांसाठी नागरिकांना करावी लागणारी कार्यालयीन धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

