मुंबई प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई महापालिका मुख्यालयात शनिवारी (१५ ऑगस्ट) उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. यावेळी मुंबईकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना, ‘चांगली, स्वच्छ, सुरक्षित, स्मार्ट आणि पर्यावरणपूरक मुंबई घडविण्याचा संकल्प’ महापौरांनी व्यक्त केला.
‘विकसित भारत २०४७’च्या प्रवासात मुंबईचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक राहणार असून, जागतिक दर्जाचे महानगर म्हणून मुंबईची ओळख अधिक भक्कम करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच नागरिकांच्या जीवनमानावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. मुंबईच्या विकासासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग, नागरी शिस्त, पारदर्शक प्रशासन आणि उत्तरदायित्व या बाबी अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ध्वजारोहण सोहळ्यास महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ताक वर्मा-लवंगारे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, नगरसेविका तथा माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह सहआयुक्त, उपआयुक्त, संचालक, सहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.
सर फिरोजशहा मेहता यांच्या पुतळ्यास अभिवादन
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात महापालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर रितू तावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्याने झाली. त्यानंतर मुंबई अग्निशमन दल आणि महापालिका सुरक्षा पथकाच्या वतीने महापौरांना मानवंदना देण्यात आली.
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना महापौरांनी आदरांजली अर्पण केली. स्वातंत्र्याचा हा वारसा जपत आधुनिक, सक्षम आणि सर्वसमावेशक मुंबई उभारणे ही आजच्या पिढीची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘इझ ऑफ लिव्हिंग’वर भर
मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनविताना केवळ मोठ्या पायाभूत सुविधा उभारणे पुरेसे नसून, मुंबईकरांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ आणि सुरक्षित होणे गरजेचे आहे. त्यामुळे ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’सोबत ‘इझ ऑफ लिव्हिंग’वरही भर देण्यात येत आहे, असे महापौरांनी सांगितले.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून महापालिका सेवा अधिक सक्षम करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, नागरी सुविधांचा दर्जा उंचावणे आणि कष्टकरी वर्गाचा सन्मान जपणे, या माध्यमातून ‘मानवी मुंबई’ घडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मुंबईच्या विकास प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयातूनच अधिक चांगले शहर उभे राहू शकते. त्यासाठी नागरिकांनी नागरी शिस्त पाळण्यासोबतच शहराच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त सहभागाचे आवाहन
‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त देशभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या राष्ट्रव्यापी उपक्रमात मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.
दरम्यान, महापालिका सचिव खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या **‘वार्षिक प्रकाशन २०२६’**चे प्रकाशनही महापौरांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर कै. वासुदेव बाळकृष्ण वरळीकर यांच्या ५४व्या स्मृतिदिनानिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस तावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
५८२ प्रवाशांची जीव धोक्यात घालून सुटका; अग्निशमन दलातील १३ जणांचा गौरव
स्वातंत्र्यदिनाच्या या सोहळ्यात मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांच्या उल्लेखनीय कामगिरीचाही गौरव करण्यात आला. राष्ट्रपतींकडून मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील एकूण १३ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे.
१९ ऑगस्ट २०२५ रोजी चेंबूर येथे सुमारे ४० ते ५० फूट उंचीवर बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये तब्बल ५८२ प्रवासी अडकले होते. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांनी जीव धोक्यात घालून बचावकार्य राबविले आणि सर्व अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका केली. या धाडसी आणि अतुलनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.
या कामगिरीबद्दल प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल परब, विभागीय अग्निशमन अधिकारी एम. व्ही. सावंत, वरिष्ठ केंद्र अधिकारी आय. के. कांबळे, केंद्र अधिकारी वाय. एच. पवार, केंद्र अधिकारी डी. ए. भोसले, यंत्रचालक राजेश राणे, यंत्रचालक महेश गुडुलकर, अग्निशामक रमेश कोळी, अग्निशामक हर्षल कटके, अग्निशामक चिंतामणी खांडेकर, अग्निशामक विकी सरवदे आणि अग्निशामक सुदर्शन पावडे यांना हा सन्मान जाहीर झाला आहे.
यावेळी राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांना महापौर रितू तावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
धोकादायक परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या शौर्याचा गौरव करताना, मुंबईच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सन्मान सोहळ्यामुळे देशसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षेप्रती असलेली बांधिलकी तयार झाली.आहे.

