स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई: सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा मुंबई पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि यशस्वी छडा लावला आहे. तांत्रिक विश्लेषत व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट बिहारमधून सराईत आरोपीला जेरबंद केले असून, गुन्ह्यातील तब्बल ७६.३९ लाख रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यासह बँक खात्याद्वारे गोठवण्यात यश मिळवले आहे.
सांताक्रूझ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी २० जून २०२६ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत बाहेरगावी असताना, जुहू तारा रोड, सांताक्रूझ (पश्चिम) येथील त्यांच्या बंद घराची खिडकी आणि बेडरूमचा दरवाजा तोडून अज्ञात चोरांनी अलमारीचा लॉकर फोडला होता. तिथून सोन्याची बिस्किटे, दागिने, रोख रक्कम आणि महागडे रोलेक्स घड्याळ असा एकूण ५४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीनुसार अभिलेखावरील आरोपी चंदन कमलेश मुखिया (वय २६, रा. दरभंगा, बिहार) याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सांताक्रूझ पोलिसांचे एक पथक तातडीने बिहारला रवाना झाले. स्थानिक सोनकी पोलिसांच्या सहाय्याने मुख्य आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याला दरभंगा येथील न्यायालयात हजर करून ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला असून, इतर सहकाऱ्यांचा कसून शोध सुरू आहे.
तपासादरम्यान आरोपीने चोरीतील रोख रक्कम एका परिचित व्यक्तीकडे देऊन स्वतःच्या नावावर जमीन खरेदी करण्यास सांगितल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी कैलास साह याच्याकडे जमा असलेली रक्कम गोठवण्याची कारवाई केली. कैलास साह याने ही रक्कम बँक खात्यात जमा केल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित बँक खात्यामधील तब्बल ४६ लाख ३९ हजार रुपये गोठवण्यात आले आहेत. तसेच कैलास साह यास बीएनएसएस कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी २०० ग्रॅम सोन्याची लगड आणि रोलेक्स कंपनीचे महागडे घड्याळ असा सुमारे ३० लाख रुपयांचा मुद्देमाल यशस्वीरित्या जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ७६.३९ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत व गोठवण्यात आली असून, यामध्ये रोलेक्स घड्याळ (किंमत अंदाजे ५ लाख रुपये), २०० ग्रॅम सोन्याची लगड (किंमत अंदाजे २५ लाख रुपये) आणि बँक खात्यात गोठवलेली ४६.३९ लाख रुपयांची रक्कम समाविष्ट आहे.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, बांद्रा) अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त (पश्चिम परिमंडळ-०२) डॉ. मोहितकुमार गर्ग, सहायक पोलीस आयुक्त (सांताक्रुझ विभाग) विनोद गावकर, सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय मसवेकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सखाराम मोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संजय कल्हाटकर, दिनकर दराडे, पोलीस उपनिरीक्षक उमेश कौलगे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी अत्यंत वेगाने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

