सातारा प्रतिनिधी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी दरे येथे मुक्कामासाठी दाखल होत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. न्यायालयातील घडामोडींवर राज्याचे लक्ष लागलेले असताना शिंदे यांचा हा दौरा नेमका कोणत्या उद्देशाने आहे, याबाबत राजकीय स्तरावर चर्चा रंगली आहे.
सर्वोच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे स्वतंत्र घटक असल्याचे ठामपणे मांडताना त्यांनी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्द्यांचा आधार घेतला. सुनावणीदरम्यान न्यायालयानेही “वादाचा मूळ प्रश्न राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील अधिकारांचा आहे,” असे निरीक्षण नोंदवल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी गुरुवारी होणार असून सिब्बल यांचा युक्तिवाद पुढे सुरू राहणार आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी दरे गावी पोहोचले आहेत. त्यांच्या या दौऱ्याचे अधिकृत कारण जाहीर करण्यात आले नसले तरी पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हा दौरा आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरे येथे मुक्कामादरम्यान शिंदे हे सातारा आणि परिसरातील पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, संघटनात्मक विस्तार आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा होणार असल्याचे समजते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही स्थानिक नेत्यांशी सविस्तर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाच्या निरीक्षणांकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. पक्षचिन्हावरचा अंतिम निर्णय शिवसेनेच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्याने दोन्ही गटांकडून या खटल्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
शिवसेना फुटीला चार वर्षे उलटून गेल्यानंतरही पक्षाचे नाव, चिन्ह आणि संघटनात्मक वैधतेचा प्रश्न न्यायालयात कायम आहे. या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या असल्या तरी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो, अशी राजकीय जाणकारांची भूमिका आहे.
अशा निर्णायक घडामोडी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गाव गाठल्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे. हा दौरा केवळ संघटनात्मक बांधणीसाठी आहे की त्यामागे अन्य राजकीय रणनीती दडलेली आहे, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असून पुढील दोन दिवसांतील घडामोडींवर राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

