सातारा प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात जनआंदोलन उभारण्याची तयारी साताऱ्यात सुरू झाली असून, “महामार्गावरील खड्डे बुजवा आंदोलन” छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन खंबाटकी घाटापर्यंतच्या मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. या कालावधीत प्रशासनाने कार्यवाही न केल्यास नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्याचे आंदोलन करतील, अशी माहिती ज्ञानविकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रसाद चाफेकर यांनी दिली.
साताऱ्याजवळील लिंब खिंड ते भुईंज या मार्गावर तसेच खंबाटकी घाटापर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे काही टोलनाक्यांच्या अवघ्या १०० ते २०० मीटर अंतरावरही रस्त्यांची दुरवस्था कायम असताना टोलची वसुली मात्र नियमित आणि महागड्या दराने केली जात असल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात लिंब खिंड ते भुईंज या मार्गावरील सुमारे ५० खड्डे प्रतीकात्मक स्वरूपात बुजविण्याची तयारी करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच राजकीय पक्षांना न जमलेले काम सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक आणि जागरूक नागरिक एकत्र येऊन करू शकतात, हा संदेश देण्याचाही प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.
यासंदर्भात पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता पायरी पुष्प अपार्टमेंट, डॉ. मोहन पाटील क्लिनिकच्या वर, रुबी हॉल क्लिनिक शेजारी, पारंगे चौक (एसटी बसस्थानकाच्या मागील बाजूस) येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला विविध सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, तसेच प्रत्येक संस्थेने किमान चार प्रतिनिधींसह सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसाद चाफेकर यांनी केले आहे.
“सामाजिक हिताच्या प्रश्नांसाठी नागरिकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. सुरक्षित आणि खड्डेमुक्त महामार्गासाठी हे आंदोलन उभारले जात असून, सर्वांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहनही त्यांनी केले.


