मुंबई प्रतिनिधी
खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पाटी लावून तिचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. अशा वाहनांवर तातडीने कारवाई करण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संबंधित यंत्रणांना विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे आता खासगी वाहनांवर ‘पोलीस’ची लाल पाटी लावून फिरणाऱ्यांवर राज्यभरात व्यापक कारवाई होण्याची शक्यता आहे.
पोलीस महासंचालक (DGP) कार्यालयाकडून यासंदर्भात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना सविस्तर परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हे आदेश देण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
तपासणी नाक्यांवर गैरफायदा
परिपत्रकानुसार, अनेकजण आपल्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पाटी लावून फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींच्या खासगी वाहनांवरही अशा प्रकारच्या पाट्या लावल्या जात असल्याने तपासणी नाक्यांवर या वाहनांची तपासणी टाळली जाते. या परिस्थितीचा गैरफायदा समाजकंटकांकडून घेतला जात असून, बनावट ‘पोलीस’ पाटी लावून विविध बेकायदेशीर कृत्यांसाठी वाहनांचा वापर केल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत.
यामुळे गुन्हेगारी कृत्ये, अवैध व्यवसाय, वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच कायद्याची दिशाभूल करण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे.
राज्यभर विशेष मोहीम
परिपत्रकात सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान खासगी वाहनांवर अनधिकृतपणे ‘पोलीस’ची लाल पाटी लावलेली आढळल्यास संबंधित वाहनचालकाविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तपासणी नाक्यांवर, महामार्गांवर तसेच शहरांमध्ये नियमित वाहन तपासणीदरम्यान अशा वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कोणत्या कायद्याअंतर्गत कारवाई?
परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा वाहनांवर महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १२२(६) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १७७ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह आवश्यक त्या इतर कायदेशीर उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.
सर्वसामान्यांना आवाहन
पोलीस प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. खासगी वाहनांवर संशयास्पदरीत्या ‘पोलीस’ची लाल पाटी लावलेली आढळल्यास त्याची माहिती तातडीने स्थानिक पोलीस ठाणे किंवा संबंधित नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ‘पोलीस’ नावाचा गैरवापर करून कायद्याची दिशाभूल करणाऱ्यांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच तपासणी नाक्यांवरील पारदर्शकता वाढून बनावट ओळख वापरणाऱ्या समाजकंटकांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.


