मुंबई प्रतिनिधी
बेस्ट उपक्रमातून १ ऑगस्ट २०२४ पासून निवृत्त झालेल्या आणि अद्यापही थकीत निवृत्तीवेतन व इतर लाभांची रक्कम न मिळालेल्या सुमारे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांची संपूर्ण थकीत देणी मिळेपर्यंत केवळ ९९ रुपयांत वर्षभरासाठी बसपास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बेस्ट दिनाचे औचित्य साधून ७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते पाच निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या विशेष बसपासचे वितरण करण्यात येणार असून त्यानंतर ही योजना औपचारिकपणे लागू होणार आहे.
बेस्टची आर्थिक परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून अडचणीत असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतनाशी संबंधित देणी, ग्रॅच्युइटी, भविष्यनिर्वाह निधी तसेच इतर आर्थिक लाभांचे वितरण विलंबाने होत आहे. परिणामी अनेक ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना वारंवार बेस्टच्या विविध कार्यालयांमध्ये पाठपुरावा करण्यासाठी जावे लागत आहे. हक्काची रक्कम मिळत नसताना प्रवासासाठीही स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांवर दुहेरी आर्थिक ताण निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात बसपास देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.
बेस्टच्या विद्यमान नियमांनुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध करून देता येत नसल्याने प्रशासनाने मध्यममार्ग स्वीकारत वर्षभराचा पास केवळ ९९ रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ १ ऑगस्ट २०२४ पासून निवृत्त झालेल्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे हा बसपास कायमस्वरूपी नसून संबंधित कर्मचाऱ्यांची सर्व थकीत देणी अदा होईपर्यंतच तो वैध राहणार आहे. ज्या दिवशी कर्मचाऱ्याला त्याची संपूर्ण थकीत रक्कम मिळेल, त्या दिवसापासून हा पास परत जमा करावा लागणार असून त्यानंतर नियमानुसार प्रवास करावा लागेल. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीच्या काळात प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार आहे.
बेस्टवर अजूनही तब्बल १,२०० कोटींच्या देणींचा बोजा
दरम्यान, बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत देणींचा प्रश्न अद्याप गंभीरच आहे. मुंबई महापालिकेने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी १,००० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यापैकी ५०० कोटी रुपये बेस्टला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या निधीतून ऑगस्ट २०२४ पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची तब्बल ४६१ कोटी रुपयांची थकीत देणी अदा करण्यात आली, अशी माहिती बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी दिली.
त्याचबरोबर उर्वरित ५०० कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या साडेतीन हजारांहून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे १,२०० कोटी रुपयांची देणी अद्याप प्रलंबित असल्याने या निधीची प्रतीक्षा कायम आहे.
टप्प्याटप्प्याने देणींचे वितरण
उपलब्ध निधीतून बेस्टने निवृत्त कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने देणी अदा केली आहेत.
मे २०२४ : २२७ कोटी रुपये
जून २०२४ : १३१ कोटी रुपये
जुलै २०२४ : ३७ कोटी रुपये
ऑगस्ट २०२४ : ३५ कोटी रुपये
एकूण ४६१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित निधी मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात अन्य निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी अदा केली जाणार आहेत.
दिलासादायक निर्णय; मात्र मूळ प्रश्न कायम
९९ रुपयांत वर्षभराचा बसपास हा निर्णय निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निःसंशय दिलासादायक असला, तरी त्यांच्या हक्काच्या निवृत्तीविषयक देणींचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. हजारो कर्मचाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे लाभ अडकून असल्याने उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून सर्व देणी अदा करण्याची मागणी निवृत्त कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. अशा परिस्थितीत बसपासची सुविधा हा तात्पुरता दिलासा असला, तरी कर्मचाऱ्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळणे हीच खरी गरज असल्याची भावना निवृत्त कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.


