सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार राजकारणाला चांगलाच उधाण आले असून जावळी तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांच्या ठराव प्रक्रियेदरम्यान झालेल्या गदारोळामुळे निवडणुकीपूर्वीचे वातावरण आणखी तापले आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीतच दोन गटांमध्ये जोरदार शाब्दिक वाद आणि धक्काबुक्की झाल्याने या घटनेची जिल्हाभर चर्चा रंगली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधी निश्चित करण्याच्या दृष्टीने विविध विकास सेवा सोसायट्यांमध्ये ठराव मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान जावळी तालुक्यातील आखाडे आणि आलेवाडी येथील विकास सेवा सोसायट्यांमध्ये दोन राजकीय गट आमनेसामने आले. ठराव मंजूर करण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चिघळले आणि दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने उपस्थितांमध्येही खळबळ उडाली.
या घटनेनंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख अंकुशबाबा कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले. जावळी तालुक्यात सत्तेचा वापर करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला.
कदम म्हणाले, विकास सेवा सोसायट्यांच्या ठराव प्रक्रियेत विरोधकांना मुक्तपणे भूमिका मांडू दिली जात नाही. कार्यकर्त्यांवर दबाव टाकणे, धमकावणे, मतभेद करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करणे आणि दडपशाहीच्या वातावरणात ठराव मंजूर करून घेणे, अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. सहकार क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारची हस्तक्षेपाची पद्धत लोकशाही मूल्यांना धक्का देणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
त्यांनी प्रशासनाने या प्रकाराची दखल घ्यावी आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष वातावरणात पार पडावी, अशी मागणीही केली. आगामी जिल्हा बँक निवडणूक लक्षात घेता विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
दरम्यान, अंकुशबाबा कदम यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले अथवा त्यांच्या समर्थकांकडून वृत्त लिहिपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती.
सहकाराच्या राजकारणात रंगणार मोठी लढत
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या तीन महिन्यांत होण्याची शक्यता असून त्यासाठी विकास सेवा सोसायट्यांचे ठराव निर्णायक मानले जात आहेत. जिल्हा बँकेवरील सत्ता मिळविण्यासाठी विविध राजकीय गटांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे प्रत्येक सोसायटीतील ठरावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विशेषतः जावळी तालुक्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांमध्ये चुरशीची लढत सुरू असल्याचे चित्र आहे. ठराव प्रक्रियेत दोन्ही गटांकडून आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून अनेक ठिकाणी राजकीय तणाव वाढत आहे.
निवडणुकीपूर्वी संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे
जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून सातारा जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे विकास सेवा सोसायट्यांच्या ठराव प्रक्रियेपासूनच राजकीय संघर्ष तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. जावळीतील ताज्या घटनेनंतर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील ठराव प्रक्रियेवरही सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काळात आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय चकमकी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


