सातारा प्रतिनिधी
वडूज: ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या उद्देशाने IIHMR बेंगलोर (इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च) यांच्या वतीने द्वारा हेल्थ फायनान्स, वडूज अंतर्गत कार्यरत नीम प्रोजेक्टमधील हेल्थ सखींसाठी आयोजित करण्यात आलेला अकरा महिन्यांचा ‘डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ अँड डिजिटल हेल्थकेअर ऑपरेशन्स’ (DCDHO) हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या या महिलांनी समुदाय आरोग्य आणि डिजिटल आरोग्य सेवा क्षेत्रातील आपले ज्ञान व कौशल्य अधिक विकसित केले असून, यामुळे ग्रामीण आरोग्य सेवेला एक नवी दिशा मिळाली आहे. नुकताच २५ जुलै २०२६ रोजी IIHMR बेंगलोर येथे आयोजित दिमाखदार पदवीदान समारंभात या सर्व यशस्वी हेल्थ सखींना डिप्लोमा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या सोहळ्यात IIHMR बेंगलोरचे अध्यक्ष डॉ. एस. डी. गुप्ता, व्हिजिटिंग शास्त्रज्ञ डॉ. नचिकेत मोर, निवृत्त आयएएस अधिकारी व ईएसआयसीचे माजी महासंचालक डॉ. सी. एस. केदार, पीएचनाच्या अध्यक्षा डॉ. शोभा प्रकाश, वर्ल्ड डायबिटीज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल कपूर, IIHMR बेंगलोरच्या संचालिका डॉ. उषा मंजुनाथ, द्वारा हेल्थ फायनान्सच्या सहसंस्थापक सौ. बिंदु अनंत तसेच IIHMR बेंगलोरचे सहयोगी प्राध्यापक व ॲडमायरचे प्रमुख डॉ. आकाश प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी समुदाय स्तरावर अविरत कार्य करणाऱ्या हेल्थ सखी या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचे गौरवोद्गार काढले. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर असंसर्गजन्य आजारांचे लवकरात लवकर निदान करणे, नियमित फॉलो-अप घेणे, आरोग्य जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी या प्रशिक्षित हेल्थ सखींची भूमिका अत्यंत मोलाची ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या विशेष डिप्लोमा अभ्यासक्रमामध्ये समुदाय आरोग्य, डिजिटल हेल्थकेअर प्रणाली, असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य सेवा, रुग्ण समुपदेशन, आरोग्य माहितीचे डिजिटल दस्तऐवजीकरण तसेच विविध डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्मच्या वापराबाबतचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या सर्वसमावेशक प्रशिक्षणामुळे हेल्थ सखी ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना अधिक प्रभावी, शास्त्रशुद्ध आणि तंत्रज्ञानाधारित आरोग्य सेवा देण्यासाठी पूर्णपणे सक्षम बनल्या आहेत.
द्वारा हेल्थ फायनान्सच्या नीम प्रोजेक्ट अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या हेल्थ सखी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर असंसर्गजन्य आजारांबाबत सातत्याने जनजागृती करणे, नियमित आरोग्य तपासणी राबवणे, रुग्णांचे योग्य समुपदेशन करणे, डिजिटल आरोग्य नोंदी तयार करणे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर योग्य उपचार मिळवून देण्यासाठी अविरत कार्यरत आहेत. हा DCDHO अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या व्यावसायिक कार्यक्षमतेत आणखी मोठी वाढ झाली असून, यामुळे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मजबूत बळ मिळणार आहे.
या कठीण आणि महत्त्वपूर्ण डिप्लोमा अभ्यासक्रमामध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या हेल्थ सखींमध्ये रेश्मा माने, कीर्ती मसाळ, दीक्षा रणपिसे, रोहिणी साळुंखे, शाहीन मुलाणी, श्रीदेवी माने, दिपाली खाडेकर, मीनाक्षी खुपसे, मधुश्री पडमळकर, सायली शेंडे आणि मनीषा आटकरी यांचा समावेश असून या सर्व कर्तृत्ववान महिलांनी मिळवलेल्या या यशाबद्दल IIHMR बेंगलोर तसेच द्वारा हेल्थ फायनान्सच्या वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचे सत्कार करत उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक अभिनंदन केले आहे. आगामी काळात ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा पोहोचविण्यात या प्रशिक्षित हेल्थ सखींचे योगदान अत्यंत प्रभावी ठरेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


