रणजित मस्के,गुन्हे वार्ताहर
पुणे : पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण केला असून, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी कारवाई समोर आली आहे. अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल (देशी कट्टा) आणि १ हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशाल प्रल्हाद कलवले (वय २६, रा. ज्ञानेश्वरी हाईटस, भिलारेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार गस्त घाालत असताना, पोलीस शिपाई मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी आणि सोहम शेंडकर यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, भिलारेवाडी येथील महानंद डेअरीजवळ एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगून उभा आहे. या खबरीत सत्यता पटल्याने पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने तात्काळ पंचांसोबत नमूद ठिकाणी छापा टाकला.
शोध घेतला असता, माहितीमध्ये वर्णनानुसार मिळून आलेला इसम विशाल प्रल्हाद कलवले याच्या अंगझडतीत ५० हजार रुपये किमतीचा देशी कट्टा व १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस २९ जुलै २०२६ रोजी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास (१३:२७ वाजता) निष्पन्न झाले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याच्या ताब्यातील हत्यारे हस्तगत केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३९३/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करीत आहेत.
ही धडाकेबाज कारवाई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि भारती विद्यापीठ विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पुणे पोलिसांची करडी नजर असून शहरात यापुढेही अशी धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.


