मुंबई प्रतिनिधी
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महागाईने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला आणखी एक झटका दिला आहे. सणासुदीच्या काळात फराळ, मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या तूप आणि बटरच्या किमती वाढल्या आहेत. देशातील आघाडीची दुग्धोत्पादन कंपनी असलेल्या अमूलने तूप आणि बटरच्या विविध पॅकच्या दरांत वाढ केली आहे. विशेष म्हणजे, एक किलो तुपाच्या किमतीत तब्बल ५० रुपयांची वाढ करण्यात आली असून, ५०० ग्रॅम बटरचा पॅकही १५ रुपयांनी महागला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार असून, यंदाचा दिवाळीचा फराळही महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमूलने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, एक किलो तुपाच्या कार्टनची किंमत ६३० रुपयांवरून थेट ६८० रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना एका किलो तुपासाठी पूर्वीपेक्षा ५० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर ५०० ग्रॅम शुद्ध तुपाच्या पाऊचची किंमत ३२५ रुपयांवरून ३४५ रुपये करण्यात आली आहे. बटरच्या दरातही वाढ करण्यात आली असून, १०० ग्रॅम बटरचा पॅक ६३ रुपयांऐवजी आता ६६ रुपयांना, तर ५०० ग्रॅमचा पॅक ३१० रुपयांऐवजी ३२५ रुपयांना मिळणार आहे. या दरवाढीचा परिणाम विशेषतः दिवाळीच्या फराळासाठी मोठ्या प्रमाणावर तूप आणि बटर खरेदी करणाऱ्या कुटुंबांवर होणार आहे.
दरम्यान, केवळ दरवाढच नव्हे, तर बाजारपेठेत अमूलच्या तुपाच्या उपलब्धतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः गाईच्या तुपाची मागणी वाढल्याने काही शहरांमध्ये त्याचा तुटवडा जाणवत असल्याचे वृत्त आहे. गुजरात आणि शेजारील राजस्थानमध्ये भेसळयुक्त तुपाविरोधात झालेल्या कारवायांनंतर ग्राहकांचा ब्रँडेड आणि विश्वासार्ह कंपन्यांच्या तुपाकडे कल वाढला आहे. त्यामुळे अमूलच्या तुपाची मागणी वाढली असून, पुरवठ्यावरही दबाव निर्माण झाला आहे. काही बाजारपेठांमध्ये गाईच्या तुपाचा साठा कमी असल्याचे चित्र आहे. परिणामी, ग्राहकांना अधिक पैसे मोजूनही अपेक्षित उत्पादन मिळेलच याची खात्री राहिलेली नाही.
ऑनलाइन खरेदीच्या प्लॅटफॉर्मवरही अमूलच्या विविध प्रकारच्या तुपाच्या किमतींमध्ये फरक दिसून येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, गाईचे तूप ७४० रुपये प्रतिलिटर, सागर तूप ७१० रुपये, शुद्ध तूप ७०० रुपये आणि म्हशीचे तूप ७२० रुपये प्रतिलिटर दराने सूचीबद्ध करण्यात आले आहे. मात्र, शुद्ध तूप, म्हशीचे तूप आणि काही कॉम्बो पॅकच्या बाबतीत साठा संपल्याचेही दाखवण्यात येत असल्याने ऑनलाइन ग्राहकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी आणि मर्यादित उपलब्धता यामुळे बाजारपेठेतील परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२५ मध्ये केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटीचा दर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी केला होता. त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, आता तूप आणि बटरच्या दरात झालेल्या वाढीमुळे जीएसटी कपातीचा फायदा काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. एकीकडे खाद्यतेल, डाळी, साखर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचा भार सर्वसामान्यांवर असताना आता तूप आणि बटरही महागल्याने घरगुती खर्चाचे गणित बिघडणार आहे. दिवाळीच्या फराळासाठी लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळ्या आणि विविध मिठाई तयार करताना तूप-बटरचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे अमूलच्या या दरवाढीचा थेट परिणाम सणासुदीच्या खरेदीवर होणार असून, यंदा दिवाळीचा गोडवा चाखतानाही सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.


