स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल २८ वर्षे न्यायालयाला गुंगारा देत फरार असलेल्या एका वॉरंट वॉन्टेडला जोगेश्वरी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. उमेश मुत्तुस्वामी गोंडर (वय ५६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मागील अठ्ठावीस वर्षांपासून लपून राहत होता. तांत्रिक विश्लेषणाआधारे करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे पोलिसांच्या गळाला एक मोठा मासा लागला आहे.
जोगेश्वरी पोलीस ठाण्यात १९९८ मध्ये गु.र.क्र. १०७/१९९८ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ४५२, ४१७, ४२७ आणि ३८० नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी उमेश गोंडर हा गुन्हा घडल्यापासून न्यायालयात गैरहजर राहत होता. त्याचा शोध लागत नसल्यामुळे अंधेरी येथील १० व्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) तसेच कायदेशीर जाहीरनामा जारी केला होता.
न्यायालयाचे आदेश बजावण्यासाठी जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे समन्स वॉरंट पथक सतत त्याच्या मागावर होते. दरम्यान, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी या पथकातील अंमलदारांना गोपनीय बातमीदारांमार्फत आरोपीचा चालू मोबाईल क्रमांक मिळाला. या मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपास केला असता, आरोपी हा डोंबिवली परिसरात राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंबिवली येथील त्याच्या राहत्या घराभोवती सापळा रचून आरोपी उमेश गोंडर यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
अटक केल्यानंतर आरोपीला अंधेरी येथील १० व्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला २००० रुपये द्रव्यदंड, १०,००० रुपयांचा रोख जामीन आणि १५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. २८ वर्षांनंतर का होईना, पण पोलिसांनी न्यायालयाचे वॉरंट यशस्वीपणे बजावून आरोपीला कायद्याच्या चौकटीत उभे केल्यामुळे पोलीस दलात कौतुक होत आहे.
सदरची उल्लेखनीय आणि धडक कामगिरी बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदसुव्यवस्था) डॉ. मनोजकुमार शर्मा, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ.अभिनव देशमुख, पश्चिम परिमंडळ-०३ चे पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे आणि मेघवाडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली समन्स वॉरंट पथकातील सहायक पोलीस फौजदार बसवंत कोरे आणि पोलीस हवालदार तानाजी सुतार यांनी ही कारवाई फत्ते केली.


