स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
वांद्रेत वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी निर्मलनगर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला गजाआड करण्यात मोठे यश मिळवले आहे. वांद्रे पूर्व भागातून रिक्षा चोरणाऱ्या या सराईताकडून पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणत चोरीला गेलेली संपूर्ण १०० टक्के मालमत्ता हस्तगत केली आहे. मोहम्मद फरहान उर्फ बोबळी सलमान शेख (वय २०, असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद इल्यास शेख (वय ४४, रा. मदनी कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व) हे रिक्षाचालक असून त्यांनी २६ जुलै २०२६ च्या रात्री आपली बजाज कंपनीची ऑटो रिक्षा (क्र. MH 02 EF 1328) वांद्रे पूर्व येथील गरीब नगर मशिदीसमोर पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते रिक्षा आणण्यासाठी गेले असता त्यांना ती जागेवर आढळून आली नाही. अज्ञात इसमाने रिक्षा चोरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी तत्काळ निर्मलनगर पोलीस ठाण्यात येऊन अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत तपासाची चक्रे वेगाने हलवली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, मात्र तांत्रिक पुरावे न मिळाल्याने तपास पथकाने आपल्या खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले. यादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, सदर रिक्षा चोरी करणारा इसम हा वांद्रे पश्चिम येथील लकी हॉटेल जंक्शन, पटेल नगर आणि वांद्रे तलाव परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ सापळा रचून वांद्रे तलाव परिसरातून संशयित मोहम्मद फरहान याला ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता, त्यानेच ही रिक्षा चोरल्याची कबुली दिली. तसेच, चौकशी दरम्यान त्याने निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिबू बारच्या मागील मैदानातून आणखी एक रिक्षा चोरल्याची धक्कादायक माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन्ही गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या रिक्षांचा ताबा मिळवत १०० टक्के मालमत्ता यशस्वीपणे हस्तगत केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची पार्श्वभूमी तपासली असता त्याच्या नावावर निर्मलनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये निर्मलनगर पोलीस ठाण्यात कलम ३०५ व ३०३(२) भा.न्या.स. अन्वये गुन्हे दाखल आहेत, तसेच आरपीएफ वांद्रे येथेही रेल्वे प्रॉपर्टी कायद्यांतर्गत कारवाई झालेली आहे. आरोपीला अटक करताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे व नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे.
सदरची ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक पारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे, पोलीस हवालदार खंडारे, वाघमारे, परदेशी आणि पोलीस शिपाई भोगले, कदम, कोळी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे वांद्रे परिसरातील वाहन चोरांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.


