नाशिक प्रतिनिधी
नाशिक शहरात सलग घरफोड्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत गुजरातमधील आंतरराज्य घरफोडी टोळीला जबरदस्त दणका दिला आहे. पंचवटी गुन्हे शोध पथकाने टोळीतील एका संशयिताला अटक केली असून त्याच्या चौकशीत १३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, घड्याळांसह ४ लाख ४३ हजार ४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आगामी सण-उत्सव आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त, संशयितांवर कारवाई आणि गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक गस्त घालत असताना एनआयटी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर काही संशयित हत्यारांसह फिरत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला असता सहा ते सात जण दोन दुचाकींवर संशयास्पद हालचाली करताना दिसले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करून धनराजसिंग शिख (वय २३, रा. नंदुरबार) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, मिरचीपूड, दोरखंड, कोयता आणि कणस अशी घरफोडीसाठी वापरण्यात येणारी साधने जप्त करण्यात आली.
सखोल चौकशीत धनराजसिंगने त्रिलोकसिंग सरदार (गुजरात), अमनसिंग शिकलकर (वडोदरा), बलवीरसिंग उर्फ गोलुसिंग शिकलकर (मध्य प्रदेश), आझादसिंग शिकलकर (गुजरात) आणि अनमोलसिंग (मध्य प्रदेश) या साथीदारांची नावे उघड केली. त्याच्याकडून पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर आणि गंगापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.
दिवसा टेहळणी, रात्री घरफोडी
पोलिसांच्या तपासात टोळीची कार्यपद्धतीही समोर आली आहे. टोळीतील सदस्य दिवसभर दोन-दोन जणांच्या गटाने वेगवेगळ्या दुचाकींवर शहरातील विविध भागांत फिरून बंद घरे आणि फ्लॅटची पाहणी करत. रात्री अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणी घरफोडी केली जात होती. या टोळीतील बहुतांश सदस्य सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेची आणखी एक कारवाई
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा विभाग दोननेही स्वतंत्र कारवाई करत घरफोडी प्रकरणातील सराईत आरोपी भरतसिंग शिकलगार याला गुजरातमधील वडोदरा येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून १ लाख ७५ हजार रुपयांचा मोबाईल व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून अजयसिंग बरनाल (मध्य प्रदेश) आणि युवराजसिंग भाटिया (बडवाणी) यांच्या साथीने हे गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली आहे. पुढील कारवाईसाठी भरतसिंगला मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईमुळे नाशिक शहरातील घरफोडीच्या मालिकेचा उलगडा झाला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये रवाना करण्यात आली आहेत.


