विटे : प्रदीप जोशी
सातारा जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे. धरणांमधील पाण्याचे समन्यायी वाटप करून कोणत्याही तालुक्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा प्राधान्याने राखीव ठेवावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर आणि तारळी प्रकल्पांच्या रब्बी हंगाम २०२६-२७ च्या कालवा सल्लागार समितीची बैठक शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत पाण्याचा वापर काटकसरीने करण्यावर भर देण्यात आला. जानेवारी महिन्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीवाटपाचे नव्याने नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधील आणि तलावांमधील गाळ काढण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. उपसा सिंचन योजनांमधील गळती रोखण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले.
कोयना धरणातील २० टक्के पाणी सिंचन आणि पिण्यासाठी राखीव ठेवावे. तसेच कोयना धरणातील पाणी वापराचे नियोजन करण्याचे अधिकार सातारा जिल्हा कालवा सल्लागार समितीला मिळावेत, यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यातील ६१ हजार हेक्टर क्षेत्रासाठी रब्बी सिंचनाचे नियोजन करण्यात आले असून गहू, ज्वारी आणि चारा पिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ११ टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे.
या बैठकीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे, आमदार अरुण लाड, धैर्यशील कदम, महेश शिंदे, मनोज घोरपडे, डॉ. अतुल भोसले, सुहास बाबर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाणी हे जीवनावश्यक साधन असून त्याचे योग्य नियोजन आणि समन्यायी वाटप करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे, अशी भूमिका पालकमंत्री देसाई यांनी मांडली


