नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशभरातील स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटीला आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. पेपरफुटीविरोधी कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करणाऱ्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सुधारणांमुळे पेपरफुटीचे रॅकेट चालविणारे, प्रश्नपत्रिका लीक करणारे तसेच परीक्षेतील गैरप्रकारांना मदत करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.
‘पब्लिक एक्झामिनेशन (प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स) ॲक्ट, २०२४’ अर्थात अँटी-पेपर लीक कायद्यात सुधारणा करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे. सुधारित कायद्यानुसार पेपरफुटी आणि संबंधित गंभीर गैरप्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्यांना दहा वर्षांपर्यंतच्या कठोर कारावासासह एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते.
NEET, UGC-NET यांसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये समोर आलेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. पेपरफुटीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करण्याबरोबरच पेपरफुटीच्या टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी कायद्यातील तरतुदी अधिक कठोर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुधारणा विधेयक येत्या सोमवारी संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर करून घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
सुधारित कायद्यात प्रश्नपत्रिका लीक करणाऱ्या संघटित टोळ्या आणि रॅकेट्सबरोबरच परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणारे किंवा त्यांना सहकार्य करणारे अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवरही कठोर कारवाई करण्यासाठी तरतुदी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आगामी काळात देशातील स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेत अधिक कडक नियंत्रण आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह दूर करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आता संसदेत या विधेयकावर काय चर्चा होते आणि त्यातील तरतुदींना अंतिम स्वरूप काय मिळते, याकडे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.


