मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या ज्या मुख्यालयातून संपूर्ण मुंबई शहराचा कारभार चालतो, त्याच इमारतीतील कँटीनमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचा फज्जा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कँटीनमध्ये देण्यात आलेल्या ताकाच्या ग्लासात माशी आढळल्याची तक्रार प्राप्त होताच अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने तातडीने कारवाई केली. तब्बल पाच तासांच्या तपासणीनंतर कँटीनमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्याने संबंधित कँटीनला टाळे ठोकण्यात आले.
या कारवाईमुळे महापालिका मुख्यालयातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या कार्यालयांमध्येच नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ताकात माशी; तक्रारीनंतर FDAची धडक कारवाई
मुंबई महापालिका मुख्यालयातील कँटीनमध्ये एका नागरिकाला देण्यात आलेल्या ताकाच्या ग्लासात माशी आढळून आली. या प्रकाराची तक्रार मिळाल्यानंतर FDAच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कँटीनची तपासणी केली. सुमारे पाच तास चाललेल्या या तपासणीदरम्यान कँटीनमधील स्वच्छता, अन्नपदार्थांची हाताळणी, साठवणूक आणि अन्नसुरक्षेशी संबंधित नियमांची पाहणी करण्यात आली.
या पाहणीत कँटीनमध्ये अस्वच्छ वातावरण असल्याचे तसेच अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर FDAने कँटीन चालवणाऱ्या कमल कॅटरर्स या ठेकेदाराला तत्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावत कँटीन सील केले.
याशिवाय मुंबई महापालिकेच्या आरोग्य आणि कामगार विभागाकडून संबंधित ठेकेदारावर ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDAची धडक मोहीम
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्नसुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कँटीन आणि खाद्य आस्थापनांवर FDAकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
मुंबई महापालिका मुख्यालयातील कँटीनवरील कारवाईही या धडक मोहिमेचा एक भाग मानली जात आहे. यापूर्वीही मुंबईतील विविध हॉटेल्स आणि कँटीनवर FDAकडून कारवाई करण्यात आली आहे.
राज्यभरात १०३ आस्थापनांची तपासणी
FDAकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ ते २१ जुलैदरम्यान राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तब्बल १०३ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळलेल्या १६ अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर ३४ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.
गोवंडीतील डेअरीतून १,६८३ लिटर दूध जप्त
दुग्ध व्यवसायाविरोधातही FDAने विशेष कारवाई केली. गोवंडी येथील एका डेअरीमध्ये दूध योग्य पद्धतीने साठवून न ठेवल्याचे आढळून आल्याने तब्बल १,६८३ लिटर दूध जप्त करण्यात आले.
या विशेष मोहिमेदरम्यान FDAच्या पथकांनी राज्यभरात ५३ छापे टाकले. या कारवाईत सुमारे १.४४ लाख रुपये किमतीचे १,७३१ लिटर दूध आणि ८९६ किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. त्याचबरोबर अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५.५६ लाख रुपये किमतीचा २,७९६.५ किलो इतर खाद्यपदार्थांचा साठाही जप्त करण्यात आला.
‘नियम तोडणाऱ्यांची गय नाही’
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ तसेच अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांविरोधात FDAची मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
महापालिका मुख्यालयातील कँटीनवरील कारवाईमुळे आता ‘सामान्य नागरिकांसाठी नियम आणि सरकारी यंत्रणांसाठी वेगळे नियम’ असा प्रकार चालणार नाही, असा संदेशही या कारवाईतून मिळाला आहे.


