रणजित मस्के, गुन्हे वार्ताहर
मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला कफ परेड पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या १० महिन्यांपासून कार चोरीच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेला हा आरोपी गुजरातवरून ट्रेनने दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने चालत्या ट्रेनमध्ये सापळा रचून त्यास शिताफीने अटक केली. या धडक कारवाईमुळे मुंबईसह गुजरात, राजस्थान आणि दिल्लीमधील मिळून एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
विपुल जयराज कापडिया (वय ५१) यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात येऊन त्यांची कार चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्यांची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (क्रमांक: MH01DE7395) ही कार कफ परेड परिसरात पार्क केलेली असताना कोणीतरी अज्ञात इसमाने ती लांबवली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे हलवली.
पाच दिवस गुजरातमध्ये ठिय्या आणि थरारक पकड
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर यांच्याकडे सोपवण्यात आला. तपास करत असताना आरोपी अत्यंत चलाख असल्याचे समोर आले, तो वारंवार आपले मोबाईल नंबर आणि लोकेशन बदलत असल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
मात्र, न खचता पो.उप.नि. नेरकर आणि त्यांच्या पथकाने थेट गुजरात गाठले. तिथे सलग ५ दिवस तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदार आणि खबऱ्यांच्या आधारे आरोपीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून सापळा रचण्यात आला. यादरम्यान, आरोपी हा अमदावाद (गुजरात) येथून ट्रेनने दिल्लीला पळून जात असल्याची पक्की माहिती मिळाली. पोलिसांनी वेळेचा विलंब न करता चालत्या ट्रेनमधून त्यास शिताफीने ताब्यात घेतले आणि अटक केली.
आरोपीची कसून चौकशी; अनेक गुन्हे उघड!
पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या आरोपीचे नाव विजय जयंती ठाकूर (वय ३१, रा. ठाकूर वास, अमोरढोल दरवाजा, वडनगर, जि. मेहसाणा, गुजरात) असे आहे. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत या सराईत चोरट्याने केवळ मुंबईतच नव्हे, तर गुजरात, दिल्ली आणि राजस्थानमध्येही अशाच प्रकारे कार चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या अटकेमुळे इतर राज्यांतील गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली आहे.
पोलिसांचे यशस्वी मार्गदर्शन आणि टीमवर्क
सदरची ही धडक कारवाई परिमंडळ ०१ चे पोलीस उपायुक्त, कुलाबा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त, कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गायकवाड आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, पोलीस हवालदार फड, पाटील, खामकर आणि पोलीस शिपाई काकडे, वाजे, जाधव, पाथरूड यांनी सहभाग घेतला. तसेच, तांत्रिक मदत पोलीस हवालदार पाटील यांनी केली. कफ परेड पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


