शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी : साई मंदिर परिसरात रविवारी रात्री भर गर्दीत एका महिलेवर चार ते पाच महिलांनी धारदार चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या रक्तरंजित हल्ल्यामुळे साई मंदिर परिसरात काही काळ एकच गोंधळ उडाला. जखमी महिलेवर साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू असून शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ समोर ही घटना घडली. स्टिकर विकणाऱ्या चार ते पाच महिलांनी काकडी व कैरी विक्री करणाऱ्या जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय ३०) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. गर्दीच्या ठिकाणी अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मंदिर परिसरात हातगाडी व फेरी व्यवसाय करणाऱ्या महिलांमधील वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे साई मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोर महिलांचा शोध घेण्याबरोबरच घटनेमागील कारणांचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


