वर्धा प्रतिनिधी
वर्धा : समृद्धी महामार्गावरील विरूळ इंटरचेंजजवळ रविवारी मध्यरात्री भीषण अपघात होऊन सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. वाहतूक कोंडीदरम्यान भरधाव ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार ट्रकखाली चिरडली गेली. या भीषण धडकेनंतर ट्रकला आग लागून तो जळून खाक झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर यापूर्वी इथेनॉल वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक वळविण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या मिरची वाहतूक करणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला.
या अपघातात कारमधील चालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ट्रकमधील चालक आणि क्लीनर यांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये पुण्यावरून मुलीचे प्रवेशाचे काम उरकून नागपूरकडे परतणाऱ्या एका कुटुंबाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर ट्रकला आग लागल्याने घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक मध्यरात्रीपासून विस्कळीत झाली असून मोठी वाहतूक कोंडी झाली.
घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


