मुंबई प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) लाखो प्रवाशांना पुन्हा एकदा भाडेवाढीचा सामना करावा लागू शकतो. काही महिन्यांपूर्वीच प्रवासी भाड्यात 10 टक्के वाढ केल्यानंतर आता आणखी 13.50 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला आहे. त्याचबरोबर तिकीटांचे दर पाच रुपयांच्या पटीत निश्चित करण्याचा प्रस्तावही संचालक मंडळापुढे ठेवण्यात आला असून, आज होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
महामंडळाच्या म्हणण्यानुसार, तिकीट देताना सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात वारंवार वाद निर्माण होतात. अनेकदा सुट्टे पैसे उपलब्ध नसल्याने व्यवहारात अडचणी येतात. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी तिकीटांचे दर पाच रुपयांच्या पटीत निश्चित करण्याचा पर्याय पुढे आला आहे. यामुळे तिकीट व्यवहार अधिक सुलभ होतील, असा दावा महामंडळाकडून करण्यात येत आहे.
मात्र, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला आणि रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या लाखो प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा प्रस्तावित भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
एसटी महामंडळ सध्या गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. इंधनाच्या वाढत्या किमती, बसच्या देखभाल-दुरुस्तीवरील खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर प्रशासकीय खर्च यामुळे महसूल वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, प्रवासी संघटनांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक भार टाकण्याऐवजी महसूल वाढीसाठी पर्यायी उपाय शोधावेत, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
आता एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे राज्यभरातील लाखो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.


