डोंबिवली प्रतिनिधी
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात अखेर मुख्य आरोपी असलेल्या शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना विष्णुनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टर संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर वाढलेला राजकीय आणि सामाजिक दबाव लक्षात घेऊन पोलिसांनी ही कारवाई केल्याचे मानले जात आहे. या प्रकरणात आता एकूण चार आरोपींना अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे.
मंगळवारी शास्त्रीनगर रुग्णालयात एका रुग्णाच्या उपचाराच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांशी हुज्जत घालत डॉ. वैभव साळुंखे आणि डॉ. सृष्टी बाविस्कर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. याचवेळी दोन परिचारिकांशीही अरेरावी आणि धक्काबुक्की करण्यात आल्याची तक्रार नोंदविण्यात आली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली.
घटनेनंतर विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रमेश म्हात्रे यांचे समर्थक रमेश पवार, प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी अद्याप मोकाट असल्याने डॉक्टर संघटना, वैद्यकीय कर्मचारी आणि नागरिकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अखेर बुधवारी दुपारी पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना ताब्यात घेत अटक केली.
या घटनेच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. राज्यातील विविध वैद्यकीय संघटनांनी डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. रुग्णालय परिसरात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देऊन जखमी डॉक्टरांची भेट घेतली. बुधवारी संध्याकाळपर्यंत मुख्य आरोपीला अटक झाली नाही, तर महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता.
या प्रकरणामुळे शिंदे शिवसेनेलाही बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. पक्षाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टरांवरील हल्ल्याचे समर्थन कोणत्याही परिस्थितीत केले जाणार नसल्याचे स्पष्ट करत रमेश म्हात्रे यांच्यावर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यानंतर पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली.
डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातून सातत्याने होत आहे. रमेश म्हात्रे यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलिस त्यांच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
डोंबिवलीतील या घटनेने पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.


