पनवेल प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या सुमारे २०० ते ३०० आंदोलकांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी अखेर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक कोंडी करून जनजीवन विस्कळीत करणे, पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करणे, शासकीय कामात अडथळा आणणे तसेच पोलिसांशी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप या गुन्ह्यात करण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रकल्पग्रस्त आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास एका पोलिस हवालदाराच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१)(३) आणि १३५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजता पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष एकत्र जमले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र या आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
आंदोलन सुरू होताच घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी जमावाला आंदोलन बेकायदेशीर असल्याची माहिती देत शांततेने तेथून निघून जाण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे पनवेल शहरातील मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक वाहनचालकांना दीर्घकाळ वाहतुकीत अडकून पडावे लागले, तर परिसरातील दैनंदिन जनजीवनावरही त्याचा परिणाम झाल्याचे पोलिसांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलन हटविण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर काही आंदोलकांनी पोलिसांशी धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली.
या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त संघटनांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. पोलिसांच्या आवाहनानंतर काही राजकीय नेत्यांनी कोणताही संघर्ष न करता स्वेच्छेने पोलीस वाहनात बसण्याचा निर्णय घेतला. मात्र काही आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी मात्र पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे. शांततापूर्ण पद्धतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आंदोलन करू दिले नाही आणि उलट आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारने विमानतळाच्या नामांतराबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. या मागणीसाठी यापूर्वीही अनेक आंदोलने, मोर्चे आणि बैठका घेण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप या प्रश्नावर अंतिम निर्णय झालेला नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी कायम आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात प्रकल्पग्रस्त संघटनांची भूमिका काय राहते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


