नाशिक प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी नाशिक जिल्ह्यासाठी ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा दिल्यानंतर संपूर्ण प्रशासन सतर्क झाले होते. विशेषतः त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक तालुक्याचा पश्चिम भाग, पेठ आणि दिंडोरी येथे कमी वेळेत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दिवसभरातील हवामानाच्या घडामोडींनंतर नाशिकवरील संभाव्य मोठे संकट टळल्याचे चित्र समोर आले आहे. हवामान तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, ढगफुटीसदृश्य पावसाला कारणीभूत ठरणारा वातावरणातील भोवरा (व्हॉर्टेक्स) आता उत्तरेकडे गुजरातच्या सुरत परिसराच्या दिशेने, तर दक्षिणेकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याकडे सरकल्याचे दिसून येत आहे.
यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यावरील तातडीचा धोका काहीसा कमी झाला असला, तरी घाटमाथा आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे. नदी-नाले, धरणे आणि डोंगराळ भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात या वातावरणीय प्रणालीमुळे सुमारे ४५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर हा भोवरा त्र्यंबकेश्वरमार्गे नाशिककडे सरकेल आणि काही भागांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, हवामानातील बदलांमुळे या प्रणालीने दिशा बदलली. परिणामी, नाशिकमध्ये अपेक्षेइतका अतिवृष्टीचा तडाखा बसला नाही. आता या प्रणालीचा परिणाम प्रामुख्याने गुजरात आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसरात जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अकोले तालुक्यासह लगतच्या डोंगराळ भागात प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, नाशिक जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी गडावरील दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. पर्यटनस्थळे, धबधबे आणि नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
अरबी समुद्रावर सक्रिय झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढली आहे. या हवामान प्रणालीमुळे काही भागांत अल्पावधीत ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. संभाव्य अतिवृष्टीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत सखल भागांतील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. पूरप्रवण भागांतील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणे, आवश्यक असल्यास स्थलांतराची तयारी ठेवणे आणि आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
नाशिकवरील तातडीचा ढगफुटीचा धोका कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी हवामान विभागाने पुढील काही तास उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


