नाशिक प्रतिनिधी
नाशिक : पत्नीने बनवलेले जेवण आवडले नाही या कारणावरून संतापलेल्या पतीने तिच्यावर उकळती आमटी ओतून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शहरातील कोणार्क नगर परिसरात घडली. या प्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय विवाहित महिला कोणार्क नगरमधील रुक्मिणी लॉन्स परिसरात पती आणि सासूसोबत राहते. नेहमीप्रमाणे तिने घरातील जेवणासाठी आमटी तयार केली होती. पती घरी आल्यानंतर त्याला जेवण वाढण्यात आले. मात्र आमटी पाहताच त्याने नाराजी व्यक्त केली आणि घरात वादाला सुरुवात झाली.
तक्रारीनुसार, यावेळी सासूनेही पतीला चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पतीचा राग अनावर झाला. त्याने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर उकळत्या आमटीचे भांडे तिच्या अंगावर ओतल्याने ती गंभीररित्या भाजली.
घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीबाबत वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून अडगाव पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
घरगुती कारणावरून घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.


