नाशिक प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सदानंद दाते यांनी गुरुवारी नाशिकमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नियोजनबद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या पोलीस महासंचालक दाते यांच्या उपस्थितीत नाशिक पोलीस आयुक्तालयात सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीसंदर्भात सविस्तर आढावा बैठक पार पडली. बैठकीस पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजयसिंह येनपुरे, ग्रामीण पोलीस अधीक्षक स्वामी यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील कुंभमेळ्यादरम्यान करण्यात येणाऱ्या बंदोबस्ताचे सादरीकरण करण्यात आले. कुंभमेळ्यातील प्रमुख स्नान पर्वणी, शाही मार्ग, वाहतूक व्यवस्था, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, सीसीटीव्ही नेटवर्क, नियंत्रण कक्ष आणि विविध संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
तसेच ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या पर्वणीच्या दिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत राबविण्यात येणाऱ्या सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा आराखडा सादर करण्यात आला. भाविकांची गर्दी सुरळीतपणे नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग, पार्किंग व्यवस्था, स्वयंसेवकांची मदत, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
सादरीकरणानंतर मार्गदर्शन करताना पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असल्याचे नमूद करत भाविकांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड होऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले. गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, दहशतवादविरोधी उपाययोजना तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यावर त्यांनी भर दिला.
भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीने सर्व विभागांमध्ये समन्वय साधून नियोजन करावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा आणि वेळोवेळी सराव कवायती घेऊन यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीसाठी पोलीस प्रशासनाने आतापासूनच व्यापक नियोजन सुरू केले असून सुरक्षा, वाहतूक आणि गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने विविध विभागांमध्ये समन्वय साधून कृती आराखडा अंतिम करण्याचे काम सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. आगामी काळात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या संयुक्त बैठका घेऊन नियोजन अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.


