वसई प्रतिनिधी
मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी जनजीवन अक्षरशः विस्कळीत केले. पालघर जिल्ह्यातील वसई-विरार परिसराला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून नालासोपारा रेल्वे स्थानक परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा कोलमडली असून हजारो प्रवासी स्थानकांवर अडकून पडले आहेत.
#WATCH | Nalasopara East, Maharashtra | Passengers walk along rainwater-filled railway tracks near Vasai station as the area continues to receive heavy rainfall pic.twitter.com/l1cXzeAs9U
— ANI (@ANI) July 6, 2026
पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नालासोपारा, वसई, सफाळे आणि पालघर दरम्यान रेल्वे रुळांवर पाण्याची पातळी सातत्याने वाढत गेली. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने अनेक ठिकाणी लोकल गाड्यांचा वेग मोठ्या प्रमाणात कमी केला, तर काही मार्गांवर सेवा तात्पुरती थांबविण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी चर्चगेट-विरार आणि डहाणू मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
🚆 Passenger Advisory | यात्री सूचना | प्रवासी सूचना ⚠️
Due to waterlogging between Vasai Road and Virar stations, train services have been temporarily suspended on this section.
⏳ Passengers are advised to expect a 15–20 minute delay in suburban local services between Vasai…— DRM – Mumbai Central, WR (@drmbct) July 6, 2026
स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
लोकल सेवा विस्कळीत झाल्याने नालासोपारा, वसई रोड, विरार, पालघर आणि सफाळे या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. अनेक गाड्या स्थानकांदरम्यान थांबून राहिल्याने प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. कार्यालयीन कामासाठी निघालेल्या नोकरदारांपासून विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच या परिस्थितीचा मोठा फटका बसला.
नालासोपारा स्थानक परिसरात साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करतानाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीचाही वेग मंदावला.
लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम
मुसळधार पावसाचा फटका केवळ उपनगरीय रेल्वे सेवेलाच नव्हे, तर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांनाही बसला आहे. रुळांवरील पाण्याची पातळी वाढल्याने अनेक एक्स्प्रेस गाड्या विरार स्थानकातच थांबविण्यात आल्या.
गुजरातमधून मुंबईकडे येणारी भावनगर–वांद्रे दुरांतो एक्स्प्रेस अनेक तास विरार स्थानकात उभी राहिली. याशिवाय इतर काही एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठा विलंब झाला. त्यामुळे देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागला.
रुळांवरील पाणी उपसण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
पश्चिम रेल्वे प्रशासनाने पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुळांवरील पाणी उपसण्यासाठी पंपांच्या साहाय्याने काम सुरू असून रेल्वे कर्मचारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पाण्याची पातळी कमी होताच टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हवामान खात्याचा इशारा कायम
हवामान विभागाने पालघर, वसई-विरार आणि मुंबई महानगर प्रदेशात पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे सखल भागांत आणखी पाणी साचण्याचा धोका कायम असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाचे आवाहन
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना अधिकृत सूचना आणि घोषणांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे सेवा सुरळीत होईपर्यंत अनावश्यक प्रवास टाळावा, प्रवासापूर्वी गाड्यांची अद्ययावत माहिती तपासावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुसळधार पावसामुळे नालासोपारा आणि वसई-विरार परिसरातील परिस्थिती अद्यापही चिंताजनक असून पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीवरील परिणाम आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


