वसई प्रतिनिधी
वसई-विरारमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, अतिवृष्टीमुळे आणखी एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागले आहेत. नालासोपाऱ्यात साचलेल्या पाण्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, वसई फाटा परिसरात उघड्या नाल्यातील पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याने २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वसई-विरारमधील पावसाशी संबंधित दुर्घटनांमधील मृतांचा आकडा आता सहावर पोहोचला आहे.
बुधवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. कविता दूधनाथ जैस्वाल (वय २२) असे मृत तरुणीचे नाव असून ती मूळची उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी होती. सध्या ती मुंबईतील गोरेगाव येथे वास्तव्यास होती. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी ती वसई फाटा परिसरात आली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याखाली उघडा नाला असल्याचा अंदाज न आल्याने तिचा पाय घसरला आणि ती थेट वेगाने वाहणाऱ्या पाण्यात कोसळली.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. काहींनी दोरांच्या साहाय्याने तर काहींनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बचावकार्य सुरू केले. मात्र, पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने कविताला बाहेर काढणे शक्य झाले नाही. काही वेळानंतर तिला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. नाका-तोंडात मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने बुडून तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या संपूर्ण बचावकार्याचा थरारक व्हिडिओ स्थानिक नागरिकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून, त्यामध्ये पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग आणि नागरिकांची जीवाची बाजी लावून सुरू असलेली धडपड स्पष्टपणे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, प्रशासनाच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता आपल्या बहिणीसोबत पायी जात असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे रस्ता आणि नाला यातील फरक ओळखता न आल्याने ती थेट नाल्यात पडली. तिच्या बहिणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले, मात्र पाण्याच्या प्रचंड वेगापुढे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी दिली.
दरम्यान, वसई-विरारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचणे, उघडी गटारे, वाहून जाणारे नाले आणि कोसळणारी झाडे यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या आठवड्यात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिक नागरिकांनी उघडी गटारे तातडीने झाकण्याची, पाणी साचणाऱ्या ठिकाणी योग्य इशारा फलक लावण्याची आणि धोकादायक भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी केली आहे. हवामान विभागानेही पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.


