वसई प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार शहराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून सखल भाग जलमय झाले आहेत. अशातच वसई पूर्वेतील राजावळी येथील वाघराळ पाडा परिसरात घडलेल्या थरारक घटनेने नागरिकांची झोप उडाली आहे. येथील मोठ्या नाल्यात आलेल्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात दोन चारचाकी वाहने वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याचा वेग अचानक वाढला. या वेगवान प्रवाहात दोन चारचाकी वाहने अडकून थेट पाण्यासोबत वाहून गेली. त्यापैकी एका व्हॅगनार कारमध्ये चालक उपस्थित होता. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की कार काही अंतरापर्यंत नाल्यातून वाहत गेली.
वाहत जाणारी कार पुढे पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या छोट्या पुलाला जोरदार धडकली. या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की पुलाचा काही भाग कोसळला. काही क्षणांसाठी परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, कार पूर्णपणे पाण्यात बुडण्यापूर्वी चालकाने प्रसंगावधान राखत कारमधून उडी मारली. त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला. स्थानिक नागरिकांनीही तत्काळ धाव घेत चालकाला सुरक्षितस्थळी आणण्यास मदत केली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला कळविण्यासोबतच तातडीने जेसीबी मागवून वाहून गेलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. सध्या जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही वाहनांना नाल्यातून बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, वाघराळ पाडा आणि आसपासच्या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचणे, नाले तुडुंब भरून वाहणे आणि नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होणे या समस्या कायम आहेत. मात्र यंदा थेट दोन कार पाण्यात वाहून जाण्याची घटना घडल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नाल्यांचे रुंदीकरण, नियमित गाळ काढणे, पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था आणि धोकादायक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही क्षणांचा विलंब झाला असता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पूरग्रस्त आणि नाल्यालगतच्या भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


