कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली असून घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून तब्बल २१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
४ जुलैअखेर जिल्ह्यात एकूण ४७६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४९.५ मिलिमीटर पाऊस झाला. शनिवारी गगनबावडा, शाहूवाडी आणि पन्हाळा या घाटमाथ्यावरील तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर शनिवारी रात्री सुमारे २६ फूट पाणीपातळीची नोंद झाली. नदीची इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट असल्याने सध्या पाणीपातळी धोक्यापासून दूर असली तरी सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राजाराम बंधाऱ्यातून सुमारे १९ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणक्षेत्रात चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घटप्रभा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. फाटकवाडी मध्यम प्रकल्पही भरल्याने तेथूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जूनअखेर कोरड्या पडलेल्या पंचगंगेसह इतर नद्या आता दुथडी भरून वाहत असून पंचगंगा नदीपात्रातील काही मंदिरेही पाण्याखाली गेली आहेत.
जिल्ह्यातील २१ बंधारे पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या भागातील संपर्क मार्गांवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि नदी-नाल्यांजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो तसेच नद्यांची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले आहे.
तालुकानिहाय पावसाची नोंद (मि.मी.)
– गगनबावडा – १०२
– शाहूवाडी – ७९.७
– राधानगरी – ६६.४
– आजरा – ६२
– पन्हाळा – ५४.३
– करवीर – ५२.५
– भुदरगड – ४६.४
– कागल – ४५.३
– चंदगड – ४४.३
– गडहिंग्लज – ४१.६
– हातकणंगले – २९
– शिरोळ – १८.४


