कोल्हापूर प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित राहून राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर सूचक भाष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेताना काही क्षण थांबून स्मितहास्य केले. त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली.
“शिवसेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,” असा उल्लेख करत शाह म्हणाले, “पूर्वी एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गट असे म्हणावे लागत होते. मात्र आता कोणताही गट उरलेला नाही. आता शिवसेना एकच राहिली आहे.” शाह यांच्या या वक्तव्याकडे शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेची अप्रत्यक्ष दखल म्हणून पाहिले जात आहे.
‘ऑपरेशन टायगर’ची राष्ट्रीय पातळीवर चर्चा
गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याची चर्चा आहे. यामध्ये संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या खासदारांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन स्वतंत्र गटनोंदणीसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली. मात्र काही तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी असल्यामुळे या खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. ओमराजे निंबाळकर वगळता इतर पाच खासदार राजस्थानमधील अज्ञातस्थळी असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
अंबाबाई मंदिरासाठी १५०० कोटींचा विकास आराखडा
राजकीय भाष्याबरोबरच अमित शाह यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. “देशभरातील भाविकांचे स्वागत करण्यासाठी अंबाबाई मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून मंदिर परिसरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील,” असे शाह यांनी सांगितले.
राम मंदिरापासून वारसा संवर्धनापर्यंत मोदी सरकारचा उल्लेख
भाषणादरम्यान शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. “आम्ही लहानपणापासून अयोध्येतील राम मंदिराबाबत ऐकत होतो. मात्र ते प्रत्यक्षात उभे राहील की नाही, याबाबत शंका होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिराचे स्वप्न साकार झाले,” असे ते म्हणाले.
“विकास आणि विरासत या दोन सूत्रांवर मोदी सरकार काम करत आहे. देशातील सांस्कृतिक वारसा जपत विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे,” असेही शाह यांनी नमूद केले.
घुसखोरीवर कठोर भूमिका
देशातील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करताना शाह यांनी पश्चिम बंगालचाही संदर्भ दिला. “एकेकाळी भाजप बंगालमध्ये पोहोचू शकणार नाही, असे म्हटले जात होते. मात्र बंगालच्या जनतेने मोठा पाठिंबा दिला. देशात कुठल्याही मार्गाने घुसखोरी होऊ देणार नाही, ही आमची भूमिका कायम आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची भूमिका पुन्हा अधोरेखित केली.
कोल्हापुरातील धार्मिक विकासाच्या कार्यक्रमात केलेल्या अमित शाह यांच्या भाषणात विकासकामांबरोबरच महाराष्ट्रातील सत्तासमीकरणे आणि शिवसेनेतील अलीकडील राजकीय घडामोडींचेही स्पष्ट प्रतिबिंब उमटल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः “आता शिवसेना एकच राहिली आहे” या त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.


