कोल्हापूर प्रतिनिधी
गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर विळ्याने सपासप वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला काही तासांतच ताब्यात घेतले आहे. मृत महिलेचे नाव चित्रांजली भीमाप्पा चितारी (वय ३८) असे असून, आरोपी पती भीमाप्पा चंद्राप्पा चितारी (वय ४५) याच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितारी दाम्पत्य नूल गावात वास्तव्यास असून भीमाप्पा चितारी हे शेती, दुग्धव्यवसाय तसेच फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा आणि मुलगी शिक्षणासाठी बाहेरगावी राहत असल्याने पती-पत्नी दोघेच घरी होते. गेल्या काही काळापासून दोघांमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
रविवारी रात्री घरासमोर दोघांमध्ये पुन्हा जोरदार बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. संतापाच्या भरात भीमाप्पा चितारी यांनी घरातील धारदार विळा उचलून पत्नी चित्रांजली यांच्या मानेवर, खांद्यावर आणि हातावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या चित्रांजली या रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या आरडाओरड्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले; मात्र तोपर्यंत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
घटनेनंतर आरोपी भीमाप्पा हा जवळील ऊसाच्या शेतात जाऊन लपून बसला. दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने पोलीस पाटील परशुराम सरनाईक यांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले आणि पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवत आरोपीला ऊसाच्या शेतातून ताब्यात घेतले.
पोलीस पाटील परशुराम सरनाईक यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची चौकशी सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण आणि दाम्पत्यातील वादाचे स्वरूप याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
अंधारामुळे सुरुवातीला दुर्लक्ष
घटना घडली त्या वेळी गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरात अंधार होता. चितारी दाम्पत्यामध्ये नेहमीच वाद होत असल्याने सुरुवातीला शेजाऱ्यांनी या आरडाओरड्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र काही वेळाने संशय आल्याने नागरिक घटनास्थळी पोहोचले असता चित्रांजली या गंभीर अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
चित्रांजली चितारी यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू आणि नणंद असा परिवार आहे. एका क्षणाच्या संतापातून घडलेल्या या घटनेमुळे नूल गावासह संपूर्ण सीमाभागात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.


