कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथे बुधवारी संध्याकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. चारित्र्याच्या संशयातून एका पतीने आपल्या पत्नीवर भररस्त्यात धारदार कोयत्याने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केली. शेकडो नागरिकांच्या डोळ्यांसमोर हा रक्तरंजित प्रकार घडला. नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हातातील रक्ताळलेला कोयता दाखवत धमकावले आणि “हे आमचं अंतर्गत प्रकरण आहे, कोणीही मध्ये पडू नका,” अशी गर्जना केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत महिलेचे नाव अमृता दीपक कांबळे (वय ३०) असे असून, आरोपी दीपक कांबळे (वय ३५) याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेत अटक केली आहे. हत्येनंतर “विषय संपवला” असे ओरडत मिशीवर ताव मारत आरोपीने दाखवलेली निर्ढावलेली वृत्ती पाहून उपस्थित नागरिकही हादरले.
हत्येपूर्वी मोबाईलवर ठेवले धक्कादायक स्टेटस
या हत्येपूर्वी आरोपी दीपकने आपल्या मोबाईलवर एक धक्कादायक स्टेटस ठेवले होते. “आज माझा तरी शेवट… नाही तर पुढच्याचा” अशा आशयाचे स्टेटस त्याने सोशल मीडियावर अपलोड केल्याची माहिती समोर आली आहे. या स्टेटसमुळे आरोपीने हत्येचे नियोजन आधीच केले होते का, या दृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.
प्रेमविवाहानंतर संसारात संशयाचे सावट
दीपक आणि अमृता यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला दोन लहान मुली आहेत. सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दीपक पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. या कारणावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कौटुंबिक कलह वाढल्यानंतर अमृता यांनी कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेतला होता.
वकिलाला भेटण्यासाठी गेली अन् बाहेरच दबा धरून बसला पती
बुधवारी संध्याकाळी अमृता पेठवडगाव येथील एका व्यावसायिक संकुलात वकिलांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. याची माहिती मिळताच दीपक धारदार कोयता घेऊन त्या परिसरात आधीच दबा धरून बसला. अमृता बाहेर येताच त्याने त्यांना अडवले. दोघांमध्ये काही वेळ शाब्दिक वाद झाला आणि क्षणार्धात त्याचे रूप भीषण हल्ल्यात झाले.
भररस्त्यात सपासप वार; मदतीला धावलेल्यांनाही धमकावले
रागाच्या भरात दीपकने अमृता यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. गंभीर जखमी झालेल्या अमृता रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि मदतीसाठी आर्त हाका मारू लागल्या. परिसरातील नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले. काही तरुणांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र दीपकने हातातील रक्ताळलेला कोयता फिरवत, “ती माझी पत्नी आहे… हे आमचं अंतर्गत मॅटर आहे… कोणीही मध्ये पडू नका,” अशी धमकी दिली. त्यामुळे काही काळ नागरिकही भयभीत झाले.
त्यानंतर आरोपीने पुन्हा अमृता यांच्यावर वार केले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भररस्त्यात घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांची तातडीने कारवाई
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी दीपक कांबळेला ताब्यात घेतले. हत्येसाठी वापरण्यात आलेला कोयताही जप्त करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमागील नेमके कारण, पूर्वनियोजन होते का, तसेच मोबाईलवरील स्टेटससह इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
परिसरात हळहळ; दोन चिमुकल्या मुलींच्या भवितव्याची चिंता
या घटनेमुळे पेठवडगाव परिसरात शोककळा पसरली आहे. प्रेमविवाह करून संसार थाटलेल्या या दाम्पत्याचा शेवट एवढ्या भीषण स्वरूपात होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. या घटनेत दोन निष्पाप मुलींच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचार, महिलांची सुरक्षितता आणि चारित्र्याच्या संशयातून घडणाऱ्या गुन्ह्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा प्रकरणांमध्ये वेळेत समुपदेशन आणि कायदेशीर हस्तक्षेपाची गरज आहे.


