शिमला:
हिमाचल प्रदेशातील जगप्रसिद्ध अटल बोगद्याच्या बाहेर बुधवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. भरधाव वेगाने बोगद्यातून बाहेर पडलेली स्कॉर्पिओ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या बॅरिकेड्सना तोडत थेट एका निर्माणाधीन काँक्रीट पिलरच्या लोखंडी सळयांवर जाऊन आदळली. या भीषण धडकेत पिलरच्या टोकदार लोखंडी सळया स्कॉर्पिओमधून आरपार गेल्याने कारचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
અટલ ટનલ નોર્થ પોર્ટલ પર અકસ્માત: સ્કોર્પિયો ખીણમાં ખાબકીઅને લોખંડના સળિયા પર ફસાઈ ગઈ; એકનું મોત, ત્રણ ઘાયલ pic.twitter.com/bUcZbxIGA6
— Krishna (@HeyKisu) July 2, 2026
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण हा राजस्थानचा रहिवासी असून जखमी तिघे उत्तर प्रदेशातील आहेत. हे सर्व मित्र पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशात आले होते. मनाली येथे पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर ते लाहौलच्या दिशेने प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे नऊच्या सुमारास स्कॉर्पिओ अटल बोगद्यातून बाहेर पडताच तिचा वेग अत्यंत जास्त होता. अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्याच्या कडेला उभारलेले सुरक्षा बॅरिकेड्स मोडीत काढत थेट निर्माणाधीन पिलरच्या लोखंडी सांगाड्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की पिलरच्या लोखंडी सळया कारच्या पुढील भागातून आरपार गेल्या.
अपघातानंतर घटनास्थळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कार लोखंडी सळयांमध्ये अडकून पडल्याने जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विशेष उपकरणांच्या साहाय्याने बचावकार्य राबवत जखमींना बाहेर काढले.
सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
प्राथमिक तपासात वाहनाचा भरधाव वेग आणि चालकाचे सुटलेले नियंत्रण हे अपघातामागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. मात्र, अपघातामागे अन्य कोणतेही कारण होते का, याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत.
दरम्यान, अपघातानंतरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. लोखंडी सळयांमध्ये अडकलेली स्कॉर्पिओ आणि तिची झालेली भीषण अवस्था पाहून अपघाताच्या तीव्रतेची कल्पना येत असून या दुर्घटनेने पर्यटकांसह स्थानिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन
या दुर्घटनेनंतर हिमाचल पोलिसांनी डोंगराळ भागातील रस्त्यांवर वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः बोगद्यांतून बाहेर पडताना वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.


