सातारा प्रतिनिधी
समर्थ मंदिर ते बोगदा मार्गावरील पक्क्या अतिक्रमणांवर कोणताही राजकीय दबाव न जुमानता धडक कारवाई करून सातारा नगरपालिकेने शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेचा ठसा उमटवला होता. या कारवाईनंतर शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांवरही प्रशासन तितक्याच कठोरपणे कारवाई करणार, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, गोडोली परिसरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची प्रक्रिया आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) एका ‘ना हरकत’ पत्रावर अडकली असून, मोहिमेला तात्पुरता ब्रेक लागला आहे.
शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे पदपथांवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाहू चौक, केसरकर पेठ, राधिका रस्ता, राजपथ, खण आळी तसेच देवी चौक ते गोलबाग या प्रमुख मार्गांवर पदपथांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. दुसरीकडे, पोवई नाका, साईबाबा मंदिर, गोडोली जकात नाका, अजंठा चौक ते मराठा हॉटेल या मार्गावर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनत आहे.
याच पार्श्वभूमीवर नगरसेवक रवी पवार यांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडे गोडोली परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटविण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
मात्र, संबंधित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने नगरपालिकेला थेट कारवाई करता येत नाही. नियमानुसार कारवाईपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची ‘ना हरकत’ आवश्यक असल्याने नगरपालिकेच्या शहर विकास विभागाने १५ जून रोजी कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून परवानगीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप या पत्राला मंजुरी मिळालेली नसल्याने कारवाई पुढे सरकू शकलेली नाही.
दरम्यान, पावसाळ्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी, अतिक्रमण हटावासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची मर्यादित उपलब्धता, तीच यंत्रणा इतर विकासकामांसाठी वापरण्याची गरज तसेच संवेदनशील भागांमध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून घेण्यातील अडचणी यामुळेही मोहिमेचा वेग मंदावल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, शाहूपुरी चौक परिसराची नुकतीच पाहणी करण्यात आली असून, तेथील अतिक्रमणे हटविण्याबाबत मुख्याधिकारी विनोद जळक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्ष कारवाईला अद्याप सुरुवात झालेली नाही.
अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी मात्र मोहिमेबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत, “अतिक्रमण हटाव मोहीम बंद झालेली नाही. हा केवळ तात्पुरता अल्पविराम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची आवश्यक परवानगी, पोलीस बंदोबस्त आणि यंत्रणांमधील समन्वय पूर्ण होताच पुन्हा धडक कारवाई सुरू केली जाईल,” असे स्पष्ट केले.
प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे आता गोडोलीसह शहरातील नागरिकांचे लक्ष लागले असून, वाहतूक कोंडी आणि पदपथांवरील अतिक्रमणाचा प्रश्न नेमका कधी मार्गी लागणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.


