रणजित मस्के, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: वैजापूर ते शिर्डी महामार्गालगत बेलगाव शिवारात एका परप्रांतीय मजुराची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पैसे लुटण्याच्या उद्देशाने ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १७ जून २०२६ रोजी सकाळी बेलगाव शिवारातील एका पडिक शेतात पुरुषाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिसांना एक मोबाईल सापडला. त्यातील फोटोच्या आधारे तपास केला असता, मयत इसम सिताराम सज्जनलाल बावरी (वय ३०, रा. रुपाहेलीकला, जि. भिलवाडा, राजस्थान) असल्याचे स्पष्ट झाले. सिताराम हा वैजापूर परिसरात मजुरीचे काम करत होता. १५ जूनच्या रात्री तो बेपत्ता झाला होता. त्याच्या भावाने केलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी झाली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल उर्फ कुणाल पप्पू कुंभारकर (वय १८, रा. पोटे गल्ली, वैजापूर) आणि ऋषिकेश उर्फ सोनु अजय त्रिभुवन (वय २३, रा. बेलगाव) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. १५ जूनच्या रात्री सिताराम रस्त्याने जात असताना, आरोपींनी त्याला अडवून पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून निर्जन स्थळी नेले. तिथे त्याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडाने मारहाण करून ठार केले. ओळख पटू नये म्हणून त्याच्या खिशातील ३५० रुपये काढून घेत मृतदेहावर गवत आणि पालापाचोळा टाकून तो पेटवून दिला.
तपास पथकाची कामगिरी
ही कामगिरी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस उपनिरीक्षक भागीनाथ वाघ, पोलीस हवालदार कासीम शेख, पोलीस हवालदार विष्णु गायकवाड, पोलीस हवालदार सचिन राठोड, पोलीस हवालदार सुनिल गोरे, पोलीस हवालदार संतोष डोंगरे, पोलीस हवालदार शिवानंद बनगे, पोलीस हवालदार अशोक वाघ, पोलीस हवालदार अनिल काळे, पोलीस हवालदार बलविर बहुरे, पोलीस हवालदार संजय तांदळे, पोलीस हवालदार शिवाजी मगर, सायबर सेलचे पोलीस हवालदार योगेश तरमाळे आणि पोलीस हवालदार जिवन घोलप यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत.


